
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर- तंदुरूस्त शरीर हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या वतीने रविवार दि.५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय पंढरपूर हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये चार हजार स्पर्धक सहभागी होतील असा विश्वास असोसिएशनचे अध्यक्ष भारत ढोबळे यांनी व्यक्त केला.
पंढरपूर रनर्सच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्याध्यक्ष विश्वंभर पाटील, उपाध्यक्ष डॉ.मंदार सोनवणे, सचिव बालाजी शिंदे, दिलीप कोरके, डॉ.संगिता पाटील, रेखा चंद्रराव, माधुरी माने, जयलक्ष्मी माने आदी उपस्थित होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये शरीर हे तंदुरूस्त ठेवण्याची अत्यंत गरज आहे. यासाठी धावणे हा सर्वोत्तम व्यायाम असून याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पंढरपूर रनर्स असोसिएशनची स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी आहेत. दरम्यान या संघटनेच्या वतीने प्रथम २०२० साली मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. २०२१ साली कोरोनामुळे आभासी पध्दतीने मॅरेथॉन स्पर्धा पार पडली तर २०२२ साली लॉकडाऊनमुळे याचे आयोजन करण्यात आले नाही. मात्र या वर्षी मोठ्या प्रमाणात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साडे तीन किमी., १० किमी. व २१ किमी. धावणे या तीन प्रकारामध्ये स्पर्धक भाग घेवू शकतात. यासाठी अनुक्रमे ६०० रूपये, ९०० रूपये व १२०० रूपये प्रवेश फी असणार आहे. प्रत्येक स्पर्धकांना टि शर्टसह विविध वस्तुंचे किट दिले जाणार आहे. यामध्ये एक चिप असून धावताना याच्या माध्यमातून स्पर्धक किती किमी. धावला याची तीन ठिकाणी नोंद केली जाणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रशस्तीपत्रक, मेडल देखील दिले जाणार आहे.
येथील रेल्वे मैदानापासून रविवार पाच फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजल्यापासून मॅरेथॉनला प्रारंभ होणार असून कराड रस्त्या पर्यंत तीनही गटातील स्पर्धकांना धावण्याचे लक्ष दिले जाणार आहे. स्पर्धेच्या मार्गात पोष्टीक पेय, पदार्थ ठेवले जाणार असून फिजिओथेरीपी व रूग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. यासह धावण्याच्या मार्गावर विविध प्रशालेतील विद्यार्थी, झांज, ढोलपथक व्दारे स्पर्धकांचे प्रोत्साहन वाढविणार आहेत.
२०२० साली पहिल्या पंढरपूर मॅरेथॉनमध्ये अडीच हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आता देखील ५०० हून अधिक जणांनी नावनोंदणी केली असून सोलापूर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद पाहता चार हजार स्पर्धक यामध्ये सहभागी होतील असा विश्वास विश्वंभर पाटील यांनी व्यक्त केला. या मॅरेथॉनमध्ये एकूण तीन लाख रूपया पर्यंत रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेतील नाव नोंदणीसाठी सोनवणे हॉस्पिटल भोसले चौक, आरोग्यम क्लिनिक नाथ चौक, विठ्ठल ई बाईक शोरूम नागालँड चौक आदी ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर रनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.