विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची मुलभूत तत्त्वे समजून घेतली पाहिजेत –डॉ. सुशीलकुमार शिंदे
. प्रा.डॉ. सुशीलकुमार शिंदे व्याख्यान देताना
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “भारताची राज्यघटना ही इतर देशांच्या तुलनेत जगामध्ये आदर्श आहे. जगातील चौशष्ट देशांच्या राज्यघटनांचा प्रदीर्घ काळ अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला आदर्श असे संविधान बहाल केले. संविधान दुरुस्तीचा अधिकार संसदेला असला तरी घटनेच्या मुलभूत चौकटीस कोणीही बाधा आणू शकत नाहीत. संविधानातील मुलभूत तत्त्वे ही घटनेचा आत्मा आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे.
भारतीय संविधान हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. देशाचे सार्वभौमत्त्व अबाधित ठेवण्याचे काम शासकीय आणि प्रशासकीय पातळीवरून झाले पाहिजे ” असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुशील कुमार शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग, समारंभ समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामाजिक न्याय पर्व’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या व्याख्यानात ‘भारतीय संविधानाची मुलभूत तत्त्वे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
डॉ. सुशील कुमार शिंदे पुढे म्हणाले की, “भारतीय संसदेत सर्वच विचाराच्या लोकांचे प्रतिनिधी पोहोचावेत. त्यांच्या विचारांना तेथे
संधी मिळावी याचाही विचार आंबेडकर यांनी केला होता. भारताच्या शेजारील धार्मिक लोकशाही असणाऱ्या देशांची सध्याची अवस्था पहिली की भारतीय लोकशाहीच्या स्वरूपाचे मोठेपण आपल्या लक्षात येवू शकते. समान नागरी कायद्याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज असून त्याबाबतचे योग्य आकलन करून घेणे गरजेचे आहे.”
. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करताना प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ बजरंग शितोळे, उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, डॉ अमर कांबळे, डॉ सुशीलकुमार शिंदे व डॉ दत्ता डांगे
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “भारतातील सामाजिक, शैक्षणिक, प्रादेशिक स्थिती विभिन्न असून देखील या देशात एकात्मता टिकवून ठेवण्याचे कार्य संविधानाने केले आहे.
भारतीय लोकशाही ही संविधानामुळे टिकून आहे. कायद्याच्या समोर आपण सर्वजण समान आहोत. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संविधान आदर्श आहे.”
संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करताना प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे व विद्यार्थी-विद्यार्थिनी
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्ता डांगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भारतीय संविधानाच्या उद्दिशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. दत्तात्रय चौधरी, एन.एस.एस. प्रमुख डॉ. समाधान माने, पर्यवेक्षक युवराज आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर,
व्होकेशनल विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी मानले.