शिक्षणामुळे होणारे समाज परिवर्तन हे शाश्वत स्वरूपाचे असते. – डॉ. द. ता. भोसले
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे व प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभात’ व्यक्त केले मनोगत

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “राजकारण, कायदा, प्रशासन , कार्यकर्ता आणि शिक्षण या घटकाच्या माध्यमातून समाज परिवर्तन होत असते. शिक्षण हा घटक वगळता इतर घटकाकडून होणारे परिवर्तनाचे कार्य हे तात्कालिक असते. तर शिक्षणामुळे होणारे परिवर्तन हे सर्वश्रेष्ठ असते. शिक्षण हे कोणालाही व कधीही घेता येते. काळ, वेळ, स्थळ, वय या गोष्टींच्या पलीकडे जाऊन शिक्षण घेता येते. शिक्षणामुळे होणारे परिवर्तन हे शाश्वत स्वरूपाचे असते. या प्रक्रियेतील शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. सेवानिवृत्ती ही नियत वेळेनुसार केली जात असली तरी समाजजीवनातून शिक्षक कधीही सेवानिवृत्त होत नाही.” असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे व प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभात’ प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सदाशिव कदम हे होते. यावेळी मंचावर रयत शिक्षण संस्थेचे उच्च विभागाचे सहसचिव तथा ऑडीटर प्रो. डॉ. शिवलिंग मेणकुदळे, रयतचे ओ.एस.डी. प्राचार्य शहाजी डोंगरे, ’स्वेरी’चे प्रमुख डॉ. बब्रुवान रोंगे, डॉ. राजेंद्र जाधव, बाळासाहेब पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, मुरलीधरआबा सोनवणे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख, प्राचार्य आर. डी. पवार, अमरजित पाटील, डी.व्ही.बी. उद्योग समूहाचे अभिजित पाटील, सत्कारमूर्ती प्रो. डॉ. जे. जी. जाधव व प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे व प्रा. नानासाहेब लिगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव व प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच मानपत्र प्रदान करण्यात आले.
प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेणकुदळे म्हणाले की, “सेवापूर्ती समारंभ हा कृतज्ञता सोहळा असतो. समाजाने शिक्षक म्हणून टाकलेली जबाबदारी पार पडतो. सत्कार मूर्ती समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. शिक्षक अध्ययन , अध्यापन, लेखन आदी माध्यमातून ती संधी संस्थेमुळे मिळाली ती व्यक्त करतात. समाजाच्या परिवर्तनात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. शिक्षकाला दुसरा पर्याय नाही. शिक्षकाच्या उंचीवरती त्या समाजाची उंची अवलंबून असते. प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव साहेब व प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा चालविला. सभ्य, संतुलित भाषा, समाज, विद्यार्थी यांच्याप्रती प्रेम भावना जपत राहिले.”
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. साळुंखे म्हणाले की, “मी माझ्या आयुष्यात मिळविलेले यश हे माझ्या आई-वडील, शिक्षक व सहकारी प्राध्यापकांच्या मुळे मिळविले. जिद्द, चिकाटी, मेहनत, अभ्यास, व्यासंग आदी घटकांच्या माध्यमातून मी जगत राहिलो. शिकत राहिलो, लढत राहिलो. प्राध्यापक संघटना आणि विद्यापीठ प्रशासनाने मला घडविले. त्यामुळे मी प्रशासनात यश संपादन करू शकलो.” तसेच सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव साहेब यांनी आपला जीवन प्रवास उलगडून दाखवला. आपल्या जीवनाची वाटचाल सांगताना ते म्हणाले की, “समाजातील मदत करणाऱ्या सामान्य माणसांनी मला मोठे केले. ज्ञान आणि अनुभव दिले. समाजाप्रति प्रेम करायला शिकविले. जीवनात येणाऱ्या अनेक समस्यातून आपण लढायला आणि संघर्ष करायला शिकले पाहिजे. माणसाच्या जीवनात पैशाला महत्त्व नाही त्यापेक्षा अधिक महत्त्व हे मित्रांना आहे. चांगले मित्र मिळवता आले तर आयुष्यात कांहीही कमी पडत नाही.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव कदम म्हणाले की, “मनुष्यत्त्वाचा आणि माणसांचा शोध घेणारी माणसे आयुष्यात मोठी होतात. प्रेम आणि निष्ठा या बळावर प्राचार्य डॉ. जाधव आणि प्राचार्य डॉ. साळुंखे ही मोठी माणसे बनली. रयत शिक्षण संस्थेने यांच्यातील जिद्द, चिकाटी व ज्ञान लालसा पाहून यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी कधीही अहंकार येवू दिला नाही. आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य सेवक आणि विद्यार्थ्यांसाठी केला. म्हणूनच ते कृतार्थ भावनेने सेवानिवृत्त होत आहेत.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवक कल्याण समितीचे सदस्य डॉ. सुशील शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रो. डॉ. राजाराम राठोड यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन डॉ. रमेश शिंदे व डॉ. अमर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमात ‘प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभात ओएसडी शहाजी डोंगरे, वसंतनाना देशमुख, डॉ. राजेंद्र जाधव, प्राचार्य डॉ. बब्रुवान रोंगे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, पांडुरंग जाधव, माणिक साळुंखे, दत्ता साळुंखे, विकास साळुंखे, बिभीषण जाधव व अर्चना जगताप आदींनी मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग, रयत शिक्षण परिवारातील अनेक मान्यवर व जाधव साळुंखे परिवारातील बहुसंख्य लोक हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे यांनी मानले.
.



