Uncategorized

फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यात ‘शैक्षणिक क्रांती’ हा समान धागा होता-प्रा. तानाजी ठोंबरे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर – “राजर्षी शाहू महाराज यांचा विरोध कोणत्याही जाती आणि धर्माला नव्हता तर त्यांचा खरा विरोध हा वाईट प्रवृत्तीला होता. गोर, गरीब,कष्टकरी, कामगार, वंचित, उपेक्षित अशा वर्गातील लोकांना आपले मानणारा हा राजा राजवाड्यात जन्माला आला आणि गरिबांच्या झोपडीत रमला. ज्ञानाला प्राधान्य देणारा ऋषी आणि राज्याला माणुसकीचा चेहरा देणारा राजर्षी होता.
विसाव्या शतकात सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती देणारा नेता होता.
महाराष्ट्राच्या आधुनिकतेला चालना देण्याचे कार्य त्यांनी केले.” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत व कार्यकर्ते प्रा. तानाजी ठोंबरे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात ‘राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व कार्यक्रमांतर्गत ‘प्राध्यापक प्रबोधिनी’च्या वतीने आयोजित ‘राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य, विचार व आजच्या युगाकरिता संदेश’ या विषयावर ते बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दादासाहेब
साळुंखे, उपप्राचार्य व अधिष्ठाता प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे,
उपप्राचार्य प्रोफे डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग
शितोळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, पर्यवेक्षक युवराज अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.तानाजी ठोंबरे पुढे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराज यांच्या
वेदोक्त प्रकरणाने लोकमान्य टिळक व शाहू महाराज यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले. कदाचित लोकमान्य टिळक व राजर्षी शाहू महाराज यांच्यात परिवर्तनाच्या मुद्द्यावर ऐक्य निर्माण झाले असते तर वेगळाच इतिहास घडला असता. शाहू महाराज व लोकमान्य टिळक, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्यातील ऐक्याने महाराष्ट्राला वेगळीच दिशा दिली असती. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्यामध्ये समाजात शैक्षणिक क्रांती हा समान धागा होता.
सामान्य माणूस हा यांच्या विचार आणि कार्याच्या मुळाशी होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराजांना अठ्ठेचाळीस वर्षाचे अल्पायुष्य लाभले. तरीही त्यांनी या काळात लोकोत्तर कामे केली. आपल्या राज्याला मानवी चेहरा देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेतली. पुरोगामी विचार मराठी माणसांच्या मनात पेरण्याचे फार मोठे कार्य त्यातून झाले. म्हणून महाराष्ट्र प्रगती करू शकला.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, वक्त्यांचा परिचय प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन प्रा.डॉ. चांगदेव कांबळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. तुकाराम अनंतकवळस यांनी मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close