Uncategorized
पुस्तकांमुळे मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते.” :- कवी रवि वसंत सोनार
कर्मयोगी विद्यानिकेतनच्या ग्रंथालयास पुस्तके भेट...!

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी) :- “ प्रोत्साहनपर, वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या वाचनामुळे वाचकांच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते. ” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्षाच्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, साहित्य, संगीत, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या संकल्पांतर्गत पुस्तक भेट पंधरवड्याच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले की – “ प्रोत्साहनपर पुस्तके वाचली असल्यास संबंधित व्यक्ती जीवनातील अधिकाधिक संकटांवरही सकारात्मकतेने मात करू शकते. ”
कवी रवि सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट पंधरवड्याच्या नवव्या दिवशी सौ. सविता रवि सोनार आणि कवी रवि वसंत सोनार या दांपत्यांनी कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपुरच्या ग्रंथालयासाठी स्नेहभेट स्वरुपात महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक मराठी लेखक – लेखिका, साहित्यिक, कवी आणि कवयित्री यांची वेगवेगळ्या प्रकाशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण प्राचार्या मा. सोनाली पवार यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी अनेक शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी – विद्यार्थीनी तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी कवी रवि वसंत सोनार यांच्या पन्नासाव्या जन्मदिवसाच्या औचित्याने सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. प्रशांतरावजी परिचारक यांनी कवी रवि सोनार यांचा महावस्त्र व श्रीफळ देऊन अभिनंदनपर सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि कवी रवि सोनार यांच्या पुस्तकभेट उपक्रमाचे कौतुक केले.
महाराष्ट्रातभरातील विविध प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित पुस्तकांच्या वाचनाची गोडी रसिक वाचकांना लागावी म्हणून आणि वाचाल तर वाचाल यास अनुसरून शिक्षक – शिक्षिका, विद्यार्थी – विद्यार्थीनी, साहित्य रसिक व कर्मचारी वृंद यांना बहुविध पुस्तके वाचावयास मिळण्यासाठी श्री. व सौ. सविता रवि सोनार या दाम्पत्यांच्या अनोख्या व स्तुत्य उपक्रमाचे पंढरपूर आणि परिसरातील लेखक साहित्यिक, सुजाण नागरिक तसेच रसिक वाचकांकडून कौतुक व स्वागत होत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरपूर आणि परिसरातील अनेक मराठी भाषा लेखक – लेखिका, कवी – कवयित्री, कथाकार, कादंबरीकार, प्रकाशक आणि रसिक वाचक यांनी विशेष सहकार्य केले. तर कवी रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले.






