Uncategorized
गोर – गरीब आणि गरजू लाभार्थी यांच्या अन्नसुरक्षा धान्य पुरवठा योजनेस गती द्या – आ. समाधान आवताडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी): अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत आणि आवश्यक गरजा आहेत. मंगळवेढा तालुक्यातील गोर – गरीब आणि गरजू पुरवठा लाभार्थी यांच्या स्वस्त धान्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत कार्यास गती द्या व कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सदर मोहीम गतिमान करा अशा सूचना अध्यक्ष, तालुकास्तरीय दक्षता समिती मंगळवेढा तथा आमदार आ.समाधान आवताडे यांनी पुरवठा विभाग मंगळवेढा यांना दिल्या आहेत.
पुरवठा विभागाची तालुकास्तरीय दक्षता समिती मंगळवेढा आढावा बैठक आ. समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय मंगळवेढा येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये आढावा घेत असताना आ.समाधान आवताडे यांनी पुरवठा विभागास विविध सूचना केलेल्या आहेत. या बैठकीमध्ये पुरवठा विभागाअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील शिधापत्रिका धारकांची संख्या व त्या अनुसार होणारे शिधावाटप, त्यावरील एकांके, शासनाने विहीत केलेले परिणाम आदी बाबींचा विचार करून जीवनावशक्य वस्तूंची मागणी व पुरवठा, गरज, नियतन, प्रत्यक्ष आवक आदी मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या योजनेअंतर्गत असणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी पुरवठा दक्षता समितीची स्थापना करण्याबाबत आदेशीत करण्यात आले.
येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गावोगावी ग्रामसभा या सामूहिक चर्चा व्यासपीठावर पुरवठा योजनांची माहिती देण्याच्या अनुषंगाने अन्नसुरक्षा योजना पात्र लाभार्थी यांच्या याद्या वाचन करून ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे उत्त्पन्न ४४,००० हजार व त्यापेक्षा कमी आहे व शहरी भागातील ज्या नागरिकांचे उत्त्पन्न ५९,००० हजार व त्यापेक्षा कमी आहे अशा शिधापत्रिकाधारकांचे सर्वेक्षण करून त्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना नियमांचे निकषान्वये धान्य मिळण्यास पात्र शिधापत्रिका यादीत समाविष्ट करण्याबाबत तहसीलदार मंगळवेढा, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मंगळवेढा व मुख्याधिकारी, नगरपरिषद मंगळवेढा यांनी मोहीम राबवावी असेही आ. समाधान आवताडे यांनी सदर बैठकीमध्ये सूचना केल्या.
त्याचबरोबर अर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या, उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करण्यासाठी भटकंती करणारे नाथपंथी गोसावी – डवरी समाजातील नागरिकांसाठीही शिधा उपलब्ध होणेकामी असणाऱ्या त्रुटी दूर करून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तालुक्यातील गोदाम व्यवस्थेचा आढावा घेऊन उपलब्ध साठा आणि मागणी या संदर्भात सूचना करण्यात आल्या. रास्त धान्य दुकानाच्या कार्यक्षेत्र अनुषंगाने शिफारस करणे. तालुका पुरवठा समितीतील अधिकारी व सदस्यांनी रास्त दुकानास भेट देऊन आढावा घेण्याचे आदेश आ.समाधान आवताडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सदर बैठकीस तहसीलदार तथा ग्रामस्तरीय दक्षता समिती सचिव स्वप्निल रावडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती सुप्रिया चव्हाण, नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, रास्त धान्य दुकान प्रतिनिधी सुरेश ढोणे, संचालक बापूराव काकेकर यांचेसह इतर अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


