Uncategorized
१० वर्षांनंतर पंढरपूर – विजयपूर दामाजी एक्सप्रेस रेल्वेला मिळणार गती – आ. समाधान आवताडे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
(प्रतिनिधी): देशातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या परमात्मा विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक वारकरी भाविक पंढरपूर येथे येतात. भक्तांच्या या मांदियाळी मध्ये कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वारकरी भक्तांची संख्याही लक्षणीय आहे. कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर – विजापूर व्हाया मंगळवेढा (दामाजी एक्सप्रेस) हा रेल्वेमार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी व सदर योजना कार्यान्वित करण्यासाठी पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे – पाटील यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन या संदर्भात पत्र दिले आहे.
दिलेल्या या पत्रामध्ये आ. समाधान आवताडे यांनी नमूद केले आहे की, सन २०११ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री यांनी पंढरपूर ते विजापूर व्हाया मंगळवेढा या रेल्वे योजनेसाठी अर्थसंकल्पमध्ये सर्व्हेक्षण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय स्तरावर सदर योजनेस स्थगिती देण्यात आली होती. परंतु आध्यत्मिक पंढरी असणाऱ्या पंढरपूर नगरीचे कालानुरूप खूप मोठे विस्तारीकरण झाले आहे. त्यामुळे पंढरपूर शहराचा राज्यातील व राज्याबाहेरील अनेक शहरांशी व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य आदी कार्यक्षेत्राच्या माध्यमातून वरचेवर संपर्क वाढला आहे. सदर बाबींचा विचार करता या योजनेस गती देण्यासाठी आपण आपल्या अध्यक्षतेखाली आढावा घेऊन बैठक घ्यावी अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी मंत्री महोदय यांच्याकडे केली आहे. या योजनेसाठी आ. समाधान आवताडे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. व त्या पाठपुराव्यास शासनदरबारी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी व या मार्गावरती असणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास सुलभतेसाठी व सदर योजना मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी असेही आ. समाधान आवताडे यांनी सांगितले. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी या योजनेची गरज लक्षात घेऊन आ. समाधान आवताडे यांच्या बैठकीच्या मागणी अनुसार लवकरच बैठकीचे नियोजन कळवू असे ना. रावसाहेब दानवे – पाटील यांनी आ. समाधान आवताडे यांना आश्वासन दिले आहे.
त्याचबरोबर सांगोला ते सोलापूर हा ८० की. मी. चा मार्ग मंगळवेढा मार्गे जातो. जिल्ह्यातील पूर्व -पश्चिम दिशेला असणाऱ्या अनेक प्रवाशांसाठी सांगोला – मंगळवेढा – सोलापूर या रेल्वे मार्गाचेही काम सुरु करावे अशी मागणी आ. समाधान आवताडे यांनी यावेळी केली आहे. डाळिंब उत्पादनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादकासाठी सुद्धा या योजनेमुळे मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल असेही आ. समाधान आवताडे यांनी मंत्री महोदय यांच्या निदर्शनास आणून दिले.





