Uncategorized

मराठी भाषेतील कौशल्याधारित ज्ञान मिळविल्यास करिअरच्या अनेक संधी उपलब्ध – डॉ. नामदेव शिंदे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर – “मराठी भाषेला दोन हजार वर्षाची उज्ज्वल परंपरा असून आकरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. वर्षाकाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल मराठी प्रकाशन विश्वात होत असते. संगणकाच्या क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होत असल्याने मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहचली आहे. मराठी भाषेतील कौशल्याधारित ज्ञान मिळविल्यास करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला तयार केले पाहिजे.” असे प्रतिपादन डॉ. नामदेव शिंदे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभाग आणि कला व वाणिज्य महाविद्यालय माढा यांच्या सामंजस्य करारांतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा आणि करिअरच्या संधी’ या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. चांगदेव कांबळे हे होते.
डॉ. नामदेव शिंदे पुढे म्हणाले की, “आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, प्रकाशन व्यवसाय, चित्रपट व नाट्यसृष्टी, लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात मराठी भाषेचे ज्ञान आणो कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यास रोजगाराच्या आणि करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. पद, पैसा आणि प्रतिष्ठा या बाबीही सहज साध्य होतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा, शिक्षक, महाविद्यालये व समाज यांना दुषणे न देता संधी शोधल्या पाहिजे. विद्यार्थ्यामधील सकारात्मक दृष्टीकोण त्यांना यश साध्य करून देत असतो.”
अध्यक्षीय भाषणात प्रो.. डॉ. चांगदेव कांबळे म्हणाले की, “कमी श्रमात अधिक नफा कमविण्याची पद्धती विकसित होत असल्याने विद्यार्थी वाचन आणि श्रवण या कौशल्यांपासून दूर जात आहेत. वाचनाने विद्यार्थ्यांना ज्ञान आणि आत्मविश्वास मिळतो. यशासाठी या बाबी महत्वाच्या असतात. मराठी भाषेस ज्ञानेश्वर आदी संतांचा वारसा असल्याने येथील साहित्य परंपरा समृद्ध आहे. विद्यार्थ्यांनी वाचन कला अंगिकारली तर त्यांना निश्चितच यश प्राप्त होते.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय डांगे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय डॉ. रमेश शिंदे यांनी करून दिला. या कार्यक्रमास डॉ. संगीता पैकेकरी, डॉ. दत्तात्रय अनारसे, सिनिअर विभागातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रो.. डॉ. राजाराम राठोड यांनी मानले.

 

 

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close