मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे निसर्गातील भौतिक व रासायनिक घटकात बदल – प्रा. संभाजी शेळके
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात जागतिक भूगोल दिन साजरा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “भूगोल दिन हा निसर्गाचे आभार आणि ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकात मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे भौतिक व रासायनिकरित्या बदल केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण, हवेचे प्रदूषण, मृदा प्रदूषण होत असून त्याचा प्रभाव जागतिक हवामान बदलावर होत आहे. त्यामुळे आज मनुष्याबरोबर जैवविविधतेच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे.” असे प्रतिपादन प्रा. संभाजी शेळके यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘जागतिक भूगोल दिन’ समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
प्रा. संभाजी शेळके पुढे म्हणाले की, “आज स्थानिक पातळीवर होणारी वेगवेगळी प्रदूषणे थांबवायला हवीत. मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील भौगोलिक घटकांचा अतिवापर थांबवायला हवा. विध्वंसक समाज हा विधायक आणि पर्यावरण स्नेही व्हायला हवा. निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न झाले तर जागतिक पातळीवर त्याचा पर्यावरणात संवर्धनास मदत होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “पाण्याचा अति जास्त वापर करून शेतीचा विनाश होत चालला आहे. विचित्र मानव वृत्ती व मानवी कृती पर्यावरणाचा अंत करू पाहत आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि जतन व्हायलाच हवे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. चंद्रकांत काळे यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन प्रा.सचिन सोनकांबळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य, अधिष्ठाता व प्राध्यापक ऑनलाईन उपस्थित होते. तसेच भूगोल विभागातील प्रा. डॉ. भगवान नाईकनवरे, प्रा. औदुंबर कुसुमडे प्रा. डॉ.विलास लिंगडे प्रा.उत्तम माळी, प्रा धनंजय कदम, प्रा. डॉ. प्रवीण उघडे, प्रा. हरिश्चंद्र घळके आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. भारत सुळे यांनी व्यक्त केले. करोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
……………………………………………………………………….





