“पुस्तकी ज्ञानाला कृतिशीलतेची जोड आवश्यक” -ॲड. गणेश पाटील
यशवंत विद्यालय भोसे येथे विज्ञान व गणित प्रदर्शन संपन्न!

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता येणं, हेच खरं शिक्षण असून, विद्यार्थ्यांनी गणित विज्ञान हे विषय शिकताना कृतिशील ते वर भर द्यावा’ असे प्रतिपादन अॅड. गणेश पाटील यांनी केले. यशवंत विद्यालय भोसे येथे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान व गणित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक दादासाहेब गाडे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नागनाथ काळे, उपमुख्याध्यापक दिलीप भुजबळ, पर्यवेक्षक के डी शिंदे आदी उपस्थित होते. शिक्षणप्रेमी नागरिक रावसाहेब तात्या पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून विद्यालयात भरवण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये वैज्ञानिक 187 उपकरणे तर गणिताची 121 उपकरणे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडलेली होती. यावेळी शेकडो विज्ञान व गणित विषयक रांगोळी सुद्धा विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या होत्या. विद्यालयांमध्ये भरवण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचे कौतुक करताना, त्यांनी समाजात निर्माण होणारे अनेक प्रश्न वेगवेगळ्या समस्या यावरती विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे व आपले संशोधन समाजासाठी उपयुक्त ठरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दिलीप भुजबळ यांनी आपल्या भाषणात रयत विज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन केलं जातं ही माहिती दिली. स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नागनाथ काळे यांनी ‘ज्ञान-विज्ञान यांच्या जोडीला सुसंस्कार यांची आवश्यकता आहे तरच आपले जीवन सुसह्य होईल असे सांगितले. मुख्याध्यापक दादासाहेब गाडे यांनी आपल्या भाषणात,’ प्रात्यक्षिके हा विज्ञानाचा आत्मा असून, विज्ञानातील संकल्पनांचे आकलन होण्यासाठी त्यांचे दृढीकरण होण्यासाठी आणि त्याचे उपयोजन करण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते असे सांगितले.

विज्ञान विभाग प्रमुख सिद्धेश्वर करळे यांनी आपल्या भाषणात, सध्याचे युग हे विज्ञानाचे युग असून संशोधनाच्या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, नॅनो टेक्नॉलॉजी, कोडर्डींग प्रोग्रामिंग, जेनेटिक इंजीनियरिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. पांडुरंग घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले जयवंत ढेरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.





