कासेगांव येथील यल्लामा देवीची यात्रा रद्द भाविकांनी दर्शनासाठी येवू नये — उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर दि. (28):- राज्यासह कर्नाटक व आंध्रप्रदेश योथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कासेगांव तालुका पंढरपूर येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोना व ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनीक आरोग्य हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, यात्रेसाठी बाहेरील भाविकांनी कासेगांव येथे येऊ नये असे, आवाहन उपविभागीय पोलीस अधिक्षक विक्रम कदम यांनी केले आहे.
कासेगांव तालुका पंढरपूर येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे यात्रेबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच तालुका व पोलीस प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस सरपंच सुनंदा भुसे, उपसरपंच संग्राम देशमुख, पोलीस निरिक्षक मिलींद पाटील, नायब तहसिलदार पी.के. कोळी, मंडलाधिकारी बाळासाहेब मोरे, मानकरी आबासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यल्लामा देवीची यात्रा दिनांक 30 डिसेंबर 2021 ते 01 जानेवारी 2022 या कालावधीत होणार असून, या यात्रा कालावधीत होणारे देवीचे धार्मिक विधी कासेगांव ग्रामस्थांच्या वतीने विधीवत करण्यात येणार आहेत. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या 100 मानाचे जोगती यांना प्रवेश देण्यात येणार असून, सोबत दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. असेही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.
यल्लामा देवीच्या यात्रेसाठी भाविकांनी येवू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कासेगांव मध्ये येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरेकेटींग करण्यात येणार असून, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. कोरोना व ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मा.जिल्हाधिकारी यांनी दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशान्वये रात्री 9.00 वाजलेपासून ते सकाळी 6.00 पर्यत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहनही प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.