अवैध धंद्या विरूद्ध आमदार समाधान आवताडे आक्रमक
लक्षवेधी चर्चा सत्रात विधानसभेत उपस्थित केला प्रश्र....
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मंगळवेढा (प्रतिनिधी) : मंगळवेढा तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांचे सुशासन यांना बाधा निर्माण काही बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजरोसपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांना वेळीच कायद्याची वेसण घालावी अशी आक्रमक मागणी पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभा हिवाळा अधिवेशनप्रसंगी लक्षवेधी चर्चा सत्रात विधिमंडळ सभागृहात केली आहे.
त्याचबरोबर सामाजिक ऐक्य आणि सर्वांगीण सलोखा अबाधित ठेवण्यासाठी व सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक जीवनसमूहामध्ये अवैध धंदे हद्दपार होणे अपेक्षित असताना मंगळवेढा संतभूमीत मात्र अनेक अवैध धंदे आपली पाळेमुळे घट्ट करताना निदर्शनास येत असल्याबाबतही आ. समाधान आवताडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. आ. समाधान आवताडे यांनी केलेल्या या मागणीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पाठराखण करत आ. आवताडे यांच्या मागणीला आणखी धार देत सांगितले की, मंगळवेढा शहर व तालुक्यातील दारूविक्री, ताडी, वाळू वाहतूक मटका, जुगार आदी गैरप्रकारामुळे येथील तरुणाई अक्षरशः झिंगाट होऊन व्यसनाच्या आहारी जात आहे. अशा कुसवयीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर येऊन उद्धवस्त झाले आहेत. झारीतील शुक्राचार्य कार्यप्रणाली राबवत असलेले काही बडे अधिकारी मात्र सोईस्करपणे याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे तालुक्यातील अशा गैरप्रकारांना वेळेतच अटकाव घालून गुन्हेगारी प्रवृत्ती मुळासकट उद्धवस्त करण्यासाठी व झोपेचे सोंग घेतलेल्या आणि अर्थिक, राजकीय लागेबंध आणखी घट्ट करण्यासाठी अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकारी यांची नि:पक्षपातीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व मंगळवेढा तालुक्यास न्याय द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अनेक महिला – भगिनी यांनी आ. समाधान आवताडे यांना प्रत्यक्ष असे धंदे बंद करावे अशी मागणी केली आहे. सदर मागणीची दखल घेत आ. आवताडे यांनी राज्याचे गृहमंत्री, गृहराज्यमंत्री यांना पत्रव्यवहार करून अशा समाजविघातक बाबींचा समूळ नायनाट करावा अशी मागणी केली होती. समाजात कायदा आणि सुव्यवस्था यांचे संतुलन अबाधित राहण्यासाठी कायद्याचे रक्षक म्हणून पोलीस आपली कर्तव्यसेवा बजावत असताना कायद्याचा धाक नसणारे खुद्द पोलीसांचीच हत्या करण्यास मागेपुढे बघत नाहीत. वाळूमाफियाचा पाठलाग करत असताना ५ सप्टेंबर रोजी २०२१ रोजी पोलीस शिपाई गणेश सोनलकर यांची हत्या झाली आहे. अशा घटनांमुळे मंगळवेढा तालुक्यात कायद्याचा धाक राहिला आहे का? असा प्रश्नही आ.समाधान आवताडे यांनी उपस्थित केला.
सदर मागणीचा धागा पकडत आ. समाधान आवताडे यांनी चालू हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री ना. शंभूराजे देसाई यांना अशा गैरप्रकारांना रोखण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करून मंगळवेढा तालुक्याच्या संत भुमीचे पावित्र्य जपावे अशी मागणी केली असता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, सदर धंद्यांना आणि धंदेचालकांना आश्रय देऊन जर कोणी कर्तव्यात कसूर करत असेल तर त्यांच्या कार्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच आ. समाधान आवताडे यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.