नवीन संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोटोटाइप वापरा – प्रा. अशोक सराफ
स्वेरीत डिझाईन डेव्हलपमेंट व प्रोटोटायपिंग वर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

छायाचित्र- स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरी चिन्ह व इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे मेंबर प्रा.अशोक सराफ.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन कल्पना विकसित करण्यासाठी प्रोटोटाईपचा वापर करावा.’ असे प्रतिपादन इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे मेंबर प्रा.अशोक सराफ यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये प्रा. सराफ मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात डॉ.सचिन सोनवणे यांनी ‘प्रोटोटाइप’ या विषयावरील कार्यशाळेविषयी माहिती दिली. पुढे बोलताना इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे मेंबर प्रा.अशोक सराफ म्हणाले कि, ‘प्रोटोटाइप’ हे प्रस्तावित सोल्युशनचे एक साधे प्रायोगिक मॉडेल आहे ज्याचा वापर कल्पना समजून घेण्यासाठी, डिझाईन आणि संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी आणि स्वस्तात चाचणी करण्यासाठी किंवा प्रमाणित करण्यासाठी होतो. हा अभ्यास केल्यानंतर संबंधित डिझायनर योग्य आणि संभाव्य दिशेने बदल करू शकतील. प्रोटोटाइपची अनेक रूपे आहेत आणि विविध फॉर्ममध्ये फक्त एकच गोष्ट सामायिक असते ती म्हणजे ते सर्व मॉडेल्स आपल्या कल्पनांचे मूर्त स्वरूप असतात. साधे स्केचेस किंवा स्टोरीबोर्ड, प्रस्तावित अनुभवात्मक उपाय, डिजिटल इंटरफेसचे रफ पेपर प्रोटोटाइप ही प्रोटोटाईपची उदाहरणे आहेत. प्रोटोटाइप हे परीपूर्ण उत्पादन असणे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या सोल्युशनच्या विशिष्ट भागाची चाचणी घेण्यासाठी सोल्युशनचा एक भाग प्रोटोटाईप म्हणून घेऊ शकता. यावेळी त्यांनी प्रोटोटाइपचे काही उद्देश सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यापैकी अन्वेषण आणि प्रयोग, शिकणे आणि समजून घेणे, आकर्षण चाचणी आणि अनुभव, प्रेरणादायी आणि प्रेरक इ. प्रोटोटाईप हे रुमालावरील स्केच पासून ते रोल प्लेइंग पर्यंत सर्व काही असू शकतात. तुम्हाला तुमच्या कल्पना मूर्त स्वरूपात आणि चाचणी करण्यायोग्य बनवून देणारी कोणतीही गोष्ट म्हणजे प्रोटोटाईप. प्रोटोटाईप पूर्वकल्पना निर्माण करण्यासाठी मदत करतात असे सांगून त्यांनी प्रोटोटाइप बद्दलचे काही फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. जसे की, ‘प्रोटोटाईप’ मुळे आपला वेळ आणि पैसा वाचतो तसेच तुम्ही तुमची संकल्पना संभाव्य वापरकर्त्यांना दाखवू शकता आणि चाचणी करून घेऊ शकता. प्रोटोटाइप हा तुमच्या विकासासाठी एक उपयुक्त संदर्भ आहे. तसेच ते तुमच्या प्रकल्पासाठी संदर्भ म्हणून पण काम करू शकते. प्रोटो टायपिंग मुळे तुम्हाला तुमच्या टीम बरोबर काम करायला मिळते तसेच त्यामुळे चांगल्या कल्पना निर्माण होतात. या कार्यशाळेसाठी एकूण १५० प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे डॉ. सचिन सोनवणे यांनी आभार मानले.






