बेजबाबदार ग्रामविकास अधिकारी यांची बदली करण्याची तावशी ग्रामस्थांची मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- तावशी ता. पंढरपूर येथील ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील या गेली सात वर्ष येथे कार्यरत असुन त्यांचे कारभारावर येथील ग्रामस्थ नाराज असुन त्यांची त्वरीत बदली करण्यात यावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे ग्रामस्थांनी केली आहे. येथील covid-19 आजाराची व एकूणच गावकऱ्यांची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. गेल्या महिनाभरात येथील पाच ते सहा नागरीकांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तसेच शंभराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण गावात आहेत आणि उपाययोजनेच्या अभावी आणखीही रुग्ण वाढत आहेत.
या संपूर्ण परिस्थितीला येथील निष्क्रिय आणि बेजबाबदार ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील , व ग्रामपंचायत तावशी हे जबाबदार आहेत. त्यांनी कोविड-19 आजाराचे अनुषंगाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्यामुळे येथे ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्यक्षात कामे न करता कामे केल्याचा दिखावा करून त्या वरिष्ठांची दिशाभूल करीत आहेत.
त्यांच्या निष्क्रियतेला वैतागुन गावातील युवकांनी एकत्र येऊन कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. त्याचे खोटे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले आहे. खोटे श्रेय घेवून सुद्धा त्यानी अद्यापपर्यंत युवकांनी उभारलेल्या या कोविड केअर सेंटरला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपाची मदत केलेली नाही.
संबंधित ग्रामविकास अधिकारी जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने कामे मार्गी लावण्यात अक्षम्य दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.