नागरिकांनी प्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी डॉ.बी.पी.रोंगे
गोपाळपूरमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ चे उदघाटन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर– कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांची अधिक हेळसांड होऊ नये म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून पाच हजार व त्यापेक्षा पुढे लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागात कोविड सेंटर स्थापित करण्याचे ठरले आहे. त्यानुसार गोपाळपूर ग्रामस्थ व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ग्रामस्थांसाठी गोपाळपूर मध्ये ‘कोविड केअर सेंटर’ नुकतेच सुरु करण्यात आले असून याचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक-सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या हस्ते व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
प्रारंभी गोपाळपूरचे सरपंच विलास मस्के यांनी गोपाळपूरच्या नागरिकांसाठी स्थापन केलेल्या ‘कोविड केअर सेंटर’ बद्दल प्राथमिक माहिती दिली. उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. बी.पी.रोंगे सर म्हणाले की, ‘या कोरोना महामारीच्या काळात उपचाराची सुविधा अल्पवेळेत उपलब्ध व्हावी, तसेच गोपाळपूरच्या नागरिकांची व रुग्णांची धावपळ होऊ नये म्हणून हे ‘कोविड केअर सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. उपचारासाठी सेंटर सुरु केले असले तरी सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही तेवढेच गरजेचे आहे. नागरिकांनी अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर कोठेही फिरू नये, सतत मास्कचा व सेनिटायझरचा वापर करावा. यामुळे ह्या सेंटरमध्ये कमीत कमी रुग्ण येतील. एकूणच आरोग्याची काळजी घेतल्याने कोरोना आपोआप नियंत्रणात येईल.’ गोपाळपूर मधील नागरिकांसाठी असलेल्या या ‘कोविड केअर सेंटर’ मध्ये सध्या पंचेवीस बेड असून उपचाराची जबाबदारी डॉ. महेश गुरव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जर गोपाळपूर मधील रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आली तर मोबाईल क्रमांक- ८३२९०६८३२९ यावर संपर्क साधण्याचे आवाहन गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठ समाजसेवक दिलीप गुरव, उपसरपंच विक्रम आसबे, ग्रामपंचायत सदस्य उदय पवार, गोपाळपूरचे इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी जयकुमार दानोळे, गोपाळपूरचे तलाठी मुसाक काझी, सर्व आरोग्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.