कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात मांस, मटण, मासे विक्रीवर बंदी
17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान आदेश लागू; प्राणी कत्तल आणि मांसजन्य पदार्थ विक्रीलाही मनाई


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (दि, 14 ):- कार्तिकी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी शहरात मांस, मटण, मासे विक्री आणि प्राणी कत्तल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 (2) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

कार्तिकी यात्रेचा कालावधी दि 10 ते 24 नोव्हेंबर 2026 असा असून या काळात लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. यात्रेदरम्यान शहरातील कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी दि 17 नोव्हेंबर ते दि. 24 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पंढरपूर शहरात मांस, मटण, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे संबंधित व्यावसायिक व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंदिर परिसरात ज्वालाग्राही पदार्थांच्या वाहतुकीस व साठवणुकीस प्रतिबंध
उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
पंढरपूर (दि, 14 ):- कार्तिकी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात गॅस सिलिंडर, केरोसीन तसेच स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
कार्तिकी यात्रेचा कालावधी दि. 10 ते 24 नोव्हेंबर 2026 असा असून, या कालावधीत पंढरपूर येथे सुमारे 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार घाट, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, नामदेव पायरी तसेच मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर, केरोसीन व अन्य ज्वालाग्राही पदार्थांची साठवणूक किंवा वाहतूक केल्यामुळे संभाव्य दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार दि. 20 ते 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मंदिर परिसरात गॅस, केरोसीन व स्फोटकजन्य पदार्थांची वाहतूक तसेच साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संबंधित व्यापारी, दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांनी या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000000000




