प्रा. प्रताप सर्वगोड यांची पीएच.डी.ला गवसणी;भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने सत्कार
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!' प्रत्यक्ष कृतीतून संदेश

‘पश्चिम विदर्भातील जलसंपत्तीच्या भौगोलिक अभ्यासावर संशोधन;

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर : भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भूगोल विषयात पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल पंढरपूर येथील प्रा. प्रताप राजाभाऊ सर्वगोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. प्रताप सर्वगोड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी असून, त्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती या संशोधन केंद्रातून ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केली आहे.
त्यांच्या संशोधनाचा विषय ‘Spatio-Temporal Analysis of Water Resources in West Vidarbha Region of Maharashtra (2001-2020)’ असा होता. या संशोधनामध्ये २००१ ते २०२० या कालावधीत पश्चिम विदर्भातील जलसंपत्तीचे भौगोलिक वितरण, त्यामधील प्रादेशिक असमानता तसेच कालानुरूप झालेल्या बदलांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. जलसंपत्तीचे नियोजन, उपलब्धता आणि प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
प्रा. प्रताप सर्वगोड हे पंढरपूर नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी राजाभाऊ सर्वगोड यांचे सुपुत्र आहेत.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आठवले यांच्या हस्ते प्रा. प्रताप सर्वगोड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समता सैनिक दलाचे हनमंत बंगाळे, दत्तात्रय भोसले, राजेंद्र सर्वगोड, नितीन साळवे, दिनेश धनवडे, आकाश वाघमारे, युवराज सरवदे, दत्ता सरवदे, नरेंद्र सरवदे, धनंजय आडगळे, मंगेश चौधरी,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र प्रत्येक आंबेडकरी अनुयायाने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधली पाहिजे. विशेषतः सर्व बहुजन समाजाने सर्वोच्च शिक्षण घेऊन ज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला पाहिजे.” : डॉ. प्रताप सर्वगोड




