आयडॉल शिक्षकाचा सन्मान ही केवळ कौतुकाची थाप नव्हे, तर जबाबदारीची नवी जाणीव : सविता म्हेत्रे
माळी वस्ती शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने उत्साहात सत्कार


पंढरपूर:-महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील आदर्श शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे माझ्यावरील जबाबदारी अधिक वाढली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी यापुढे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरात-माळी वस्ती (वाखरी) येथील प्रभारी मुख्याध्यापिका सविता म्हेत्रे यांनी केले.
सविता म्हेत्रे यांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पंढरी भूषणचे संपादक शिवाजीराव शिंदे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सविता म्हेत्रे म्हणाल्या की, राज्यातील शैक्षणिक धोरण आणि शिक्षण व्यवस्थेला अधिक प्रभावी दिशा देण्यासाठी शासनाने राज्यभरातून ४ हजार ४८४ शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून निवड केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील २६० शिक्षकांचा समावेश असून, पंढरपूर तालुक्यातील १६ शिक्षकांना हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे, या १६ शिक्षकांमध्ये एकमेव महिला शिक्षिका म्हणून माझी निवड झाली आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
आयडॉल शिक्षक हा केवळ पुरस्कार किंवा सन्मान नसून, शिक्षण क्षेत्रात अधिक व्यापक योगदान देण्याची संधी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणे, शिक्षकांसाठी आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे यामध्ये सहभागी होणे तसेच राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील प्रभावी प्रयोग व अनुभव पोहोचविण्याचे काम करता येणार आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देणे, हीच आपली प्राथमिकता राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दैनिक पंढरी भूषणचे संपादक शिवाजीराव शिंदे म्हणाले की, सविता म्हेत्रे या खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रातील आयडॉल आहेत. त्यांनी आपल्या शाळेमध्ये विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ, कामाप्रती असणारी निष्ठा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान यामुळेच त्यांची आयडॉल शिक्षक म्हणून झालेली निवड सार्थ ठरते. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून समाजाच्या भावी पिढीला घडविणारा शिल्पकार असतो. सविता म्हेत्रे यांच्यासारख्या कर्तृत्ववान शिक्षिकांचा सन्मान म्हणजे संपूर्ण शिक्षक वर्गाचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील शिक्षिका आशा गाडे यांनी सविता म्हेत्रे यांचे स्वागत करून शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी विजया लोखंडे व मंगल लोखंडे यांनीही त्यांचा सत्कार करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्या लाडक्या शिक्षिकेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांच्या मनातील अभिमान आणि सहकाऱ्यांच्या शुभेच्छांनी संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली जाते, तेव्हा अशा सन्मानातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. सविता म्हेत्रे यांची आयडॉल शिक्षक म्हणून झालेली निवड ही खरात-माळी वस्ती शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.




