Uncategorized

स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीत ‘पोलीस मित्र’ म्हणून बजावली उल्लेखनीय भूमिका

वारकऱ्यांच्या सेवेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान

छायाचित्र: पोलीस मित्र उपक्रमाला उपस्थित पोलीस निरीक्षक मोनिका खडके पाटील मॅडम, असिस्टंट पोलीस निरीक्षक ज्योती वाघमारे मॅडम, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक.

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर: पंढरपूर शहर पोलीस विभागाकडून दि. ०८ जुलै २०२६ रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार आषाढी वारी २०२६ दरम्यान कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांना सुरक्षित व सुलभ सेवा मिळावी या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘पोलीस मित्र’ या उपक्रमात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय कार्य केले.
दि. २३ जुलै ते २७ जुलै २०२६ या कालावधीत स्वेरीच्या सुमारे २५० राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी पंढरपूर शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधत वाहतूक नियंत्रण, वारकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, हरविलेल्या व्यक्तींना मदत, रस्ते मोकळे ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सहकार्य करणे तसेच शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेसाठी पोलीस यंत्रणेला सहाय्य करणे अशा विविध कार्यात सहभागी होऊन वारी सुरळीतपणे पार पाडण्यास हातभार लावला.
आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरात दाखल होत असल्याने पोलीस प्रशासनावर मोठा ताण असतो. अशा वेळी स्वेरीच्या स्वयंसेवकांनी ‘सेवा हीच साधना’ या भावनेतून कोणत्याही अपेक्षेशिवाय पोलीस मित्र म्हणून जबाबदारी पार पाडली. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध कामामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यात मोठी मदत झाली असून वारकऱ्यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
या उपक्रमात स्वयंसेवकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक, अर्बन बँक परिसर, अंबाबाई पटांगण, चंद्रभागा घाट परिसर, ६५ एकर परिसर, कॉलेज चौक, बसस्थानक परिसर, गौतम विद्यालय परिसर, रेल्वे स्टेशन, गोपाळपूर रस्ता, सांगोला चौक आदी गर्दीच्या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा बजावली.
या उपक्रमाचे नियोजन स्वेरीचे संस्थापक व सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांच्या प्रेरणेने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे व प्रा. हेमंत बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
स्वयंसेवकांच्या सेवाभावी कार्याची दखल घेत पंढरपूर शहर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. आषाढी वारीसारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात युवकांनी समाजसेवेचे दिलेले हे योगदान इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. आषाढी वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी पोलीस विभागाने विशेष नियोजन केले होते. या कार्यात स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांना सहकार्य करत स्वेरीच्या सेवाभावी कार्याची परंपरा कायम ठेवली.

स्वेरीच्या स्थापनेपासून पंढरपूर मध्ये भरणार्‍या चारही वारीच्या काळात स्वेरी कडून विविध उपक्रम राबविले जातात ज्यामध्ये वारीपूर्व व वारीनंतरची स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वाटप, पोलीस मित्र उपक्रम आदि बाबींचा समावेश आहे. या उपक्रमात स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close