अंतर्मुख करणारे साहित्य काळाची गरज”: प्रशांतराव परिचारक
पंढरपुरात दोन लेखसंग्रहांचे लोकार्पण


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर, :- “आजच्या धावपळीच्या आणि भौतिकवादी युगात माणसाला अंतर्मुख व्हायला लावणारे साहित्य दुर्मिळ झाले आहे,” असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले. पंढरपुरात बुधवारी ‘मनमंथन’ आणि ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ या दोन लेखसंग्रहांच्या लोकार्पण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
सीए दिनाचे औचित्य साधून झालेल्या या सोहळ्यात सीए पवनकुमार विजयकुमार झंवर लिखित ‘मनमंथन’ आणि मुख्याध्यापक वैभव सुरेश मोरे लिखित ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
प्रशांत परिचारक पुढे म्हणाले, ‘मनमंथन‘ हे पुस्तक माणसाच्या अंतर्गत संघर्षाला योग्य दिशा देणारे आहे, तर ‘प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा’ हा लेखसंग्रह दैनंदिन व्यवहारातील अप्रामाणिकपणा ओळखण्याचे सुंदर ज्ञान देतो. दोन्ही लेखकांनी समाजासमोर एक उत्तम वैचारिक ठेवा ठेवला आहे.”*
या सोहळ्यास पालवी संस्थेच्या संस्थापिका मंगलताई शहा, भागवताचार्य बाळासाहेब बडवे, भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी, प्रदीप खर्डीकर, हंसकुमार कवठेकर आणि माजी उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंगलताई शहा यांनी वैभव मोरे यांच्या लेखनातील सामाजिक तळमळीचे तर पवन झंवर यांच्या पुस्तकातील मानसिक प्रगल्भतेचे कौतुक केले. सुनील वाळुंजकर यांनी सीए पवनकुमार यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत ते साहित्य, कला आणि वक्तृत्वाचेही भोक्ते असल्याचे नमूद केले.
लेखक वैभव मोरे यांनी भावूक होत ‘ब्लॉगर ते रायटर’ या प्रवासाचे श्रेय संपादक पवनकुमार झंवर यांना दिले. तर सीए पवनकुमार झंवर म्हणाले, *”मानसशास्त्रातील क्लिष्ट सिद्धांत बाजूला ठेवून सामान्य माणसाला अंतर्मुख करणारे सोपे विचार ‘मनमंथन’मध्ये मांडले आहेत. सीए डे आणि लग्नाच्या वाढदिवसाला हा योग जुळून येणे हा दुग्धशर्करा योग आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले तर आभार राजेश खिस्ते यांनी मानले. सोहळ्यास शहरातील साहित्यिक, पत्रकार व रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




