Uncategorized

आत्मकथनाची प्रेरणा घेऊन इतरांनी आपले अनुभव मांडणे गरजेचे :- योगीराज वाघमारे 

एल. एस.सोनकांबळे यांच्या "भूक "आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-  जिल्हा हिवताप अधिकारी(सेवानिवृत्त )व बामसेफचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मण (एल. एस )सोनकांबळे यांनी लिहिलेल्या “भूक ”आत्मकथनाचे प्रकाशन 21जून रोजी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या हस्ते प्राथमिक शिक्षक सोसायटी पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे (सोलापूर) यांनी आंबेडकर चळवळीतील आत्मकथनांचा आलेख मांडताना “भूक हे पुस्तक फक्त कौटुंबिक जीवन वृत्तांत न मांडता सामाजिक भान ठेवून चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा वृत्तांत मांडला आहे” यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,”एल. एस. सोनकांबळे यांचे प्रथम अभिनंदन. फार उशिरा का होईना स्वः कथन प्रकाशीत केले आहे. हाडांचा, तळागाळातला कार्यकर्ता, प्रामाणिक आणि संघटनेत झोकून देणारा , कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आहे. अशा कार्यकत्यांचे आत्मकथन प्रसिद्ध होणे महत्वाचे आहे. त्यांची प्रेरणा घेऊन इतरांनी सुध्दा आपले अनुभव मांडणे गरजेचे आहे. त्यांची संघटनेला तसेच नविन पिढीला गरज आहे. तसे तर आपल्याकडे आत्मकथन लिहिण्याची परंपरा १९६० नंतर म्हणजे दलित साहित्याचा तथा आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्याला जेव्हा उदय झाला तेव्हा पासून आहे. नावारुपाला आलेली आणि मराठी साहित्याला हादरा देणारी आत्मकथने दिली आहेत. शंकरराव खरात यांचे “तराळ- अंतराळ’दया पवारांचे ‘बलूत‘ माधव कोंडविलकरांचे ‘ मु. पो.. देवाचे गोठणे’ बेबीताई कांबळे यांचे ‘ जीणं आमुचं ‘ शांताबाई कांबळे यांचे ‘ माझ्या जन्माची चित्तर कथा’ मुक्ता सर्वगोड यांचे’ मिटलेली कवाडे ‘  मल्लिका नामदेव ढसाळ यांचे ‘मला उध्वस्त व्हायच, शरण कुमार लिंबाळे यांचे ‘ अक्करमाशी’ पार्थ पोळके यांचं “आभरान “ लक्ष्मण माने यांचे ‘उपरा‘ तर लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या‘ उर्मिला पवार यांचे’ “आयदान “, रुस्तुम अचलखांब यांचे “गावकी” प्र.ई. सोनकांबळे यांचे “आठवणीचे पक्षी” तर आर. के. त्रिभूवन यांचे ‘दे दान सुटे गिराण“‘एकनाथ आव्हाड यांचे “जग बदल घालुनी घाव गेले सांगून मला भीमराव ” चंद्रकांत मलाडे यांचे “गिरण प्रवाशी” प्रा.भास्कर बंगाळे यांचे ‘होरपळ ते हिरवळ “भगवान इंगळे यांचे “ढोर” किशोर काळे यांचे ‘किशोर शांता काळे “तर प्रा.. अर्जुन व्हटकर यांचे “चलबट “अशी शेकडो आत्मकथने प्रसिद्ध झाली आहेत. नुसती प्रसिद्ध झाली नाही तर प्रतिष्ठेचे पुरस्कार – सन्मान मिळालेले आहेत. मराठी साहित्य प्रवाह विशाल झाला आहे. त्यांना रसिक वाचकांची पसंती मिळालेली आहे. जागतिक मान्यता मिळालेली आहे. एवढेच नव्हे तर अनेक प्राध्यापकांनी, समीक्षकांनी प्रबंध लिहिले आहेत. या पार्श्वभूमीवर एल एस सोनकांबळे यांचे आत्मकथन येत आहे त्याचे मनापासून स्वागत.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.एम डी शिंदे यांनी “भूक “या पुस्तकात मांडलेली व्यथा ही पोटाची भूक न मांडता सामाजिक जीवन जगताना हा लेखक माणसं जोडत गेला विचार मांडत गेला, प्रबोधनाची शिबिर -अधिवेशन हा लेखाजोखा या आत्मकथनात मांडला आहे. असं मत व्यक्त केले.विषमतावादी व्यवस्था घालवण्यासाठी ज्या महापुरुषांनी कार्य केले, चळवळ केली ,त्या चळवळीचं आज काय? ही व्यथा ही प्राध्यापक शिंदे यांनी व्यक्त केली. एक कार्यकर्ता म्हणून जगताना केलेल्या संघर्षाची मांडणी या पुस्तकात केली आहे. आजचं वास्तव आपण समजून घेतल्याशिवाय पुढची चळवळ व दिशा ठरवता येत नाही, असाही विचार प्रा. शिंदे यांनी व्यक्त केले 

          या कार्यक्रमाचे सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सुरुवात केली .ज्येष्ठ साहित्यिक बा. ना. धांडोरे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्तावना केली .उपस्थित मान्यवरांचा सत्कार संयोजकाच्या वतीने करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण सोनकांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुस्तक लिहिण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. शब्द शिवार चे अध्यक्ष व प्रकाशक इंद्रजीत घुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टीचे राज्य संघटक व माजी उपनगराध्यक्ष सुनील सर्वगोड हे होते. यावेळी प्रा. व्ही. जी.कुंभार सर व प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे यांनी शुभेच्छा देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. 

           या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब दोडके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन जालिंदर गायकवाड सर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भास्कर बंगाळे, ज्येष्ठ साहित्यक शिवाजीराव वाघमारे,आर् पी कांबळे ,( अध्यक्ष पंचशील मंडळ )श्रीकांत कसबे( संपादक साप्ताहिक जोशाबा टाइम्स)  ,सुनील वाघमारे ( अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर विचार मंच ) कवी ,जगदीश मागाडे,अरुण कसबे,,,वसंत कांबळे,, अरुण कांबळे,दिलीप पवार(मा.अध्यक्ष मराठा सेवा संघ ) जैनुद्दीन मुलाणी,( युवा राष्ट्र चेतना )बाळासाहेब बनसोडे,  प्रा. धैर्यशील भंडारे,  नंदकुमार वाघमारे सर , अशोक गायकवाड,सुखदेव माने व आनंद होवाळ यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close