Uncategorized

चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर (दि.३१):- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या प्रमुख यात्रांसह एकादशी दिवशी लाखो भाविक तसेच दररोज हजारो भाविक पंढरपूरला येतात. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबत चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पुर्ण केल्याचे समाधान मिळत नसते त्यामुळे वारकरी संप्रदायात विठ्ठल रुक्मिणी दर्शना एवढेच चंद्रभागेच्या पवित्र स्नानाला महत्त्व असल्याने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.


कार्तिक यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज पंढरपूर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपक धोत्रे यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मंदिर समिती व नगरपालिका प्रशासनाने चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर येथील वारी कालावधीतच स्वच्छता न करता दररोज स्वच्छता करावी. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटले पाहिजे. तसेच वाळवंटात ज्यादा तात्पुरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध ठेवावी त्याचबरोबर वाळवंटात कायमस्वरूपी पर्यावरण पूरक शौचालय स्थापन करण्याबाबतचे नियोजन करावे. उघड्यावर शौचालयास बसू नये यासाठी जनजागृती व आवश्यक उपाययोजना कराव्यात. दर्शन रांगेतील भाविकांना तात्काळ व सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन तसेच दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर भाविकांना सुरक्षा रक्षकांचा नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन, सुरक्षारक्षकांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमावेत.


चंद्रभागा नदी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते यासाठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सुस्थितीत बोटी तसेच प्रशिक्षक कर्मचारी सज्ज ठेवावेत. महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करावेत चंद्रभागा एसटी स्टँडवर स्वच्छता व सुलभ सौचालयाची व्यवस्था करावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारी कालावधीत अवैध दारू विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत नियोजन करावे. आषाढी वारी प्रमाणेच कार्तिकी यात्रेत भाविकांना सुविधा द्याव्यात आषाढी यात्रा कालावधीत सर्व विभागाने उत्तम नियोजन केल्याने आषाढी वारीत भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते त्याच पद्धतीने कार्तिक वारीतही नियोजन करावे अशा सूचनाही पालकमंत्री श्री गोरे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मंदिर समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, एसटी महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांचा आढावा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी घेतला.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली दर्शन रांग व पत्रा शेड येथील पाहणी
कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनरांग , पत्राशेड येथे मंदिर समितीकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात. या ठिकाणी देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्याधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
यावेळी दर्शनरांगेतील भाविकांना मंदीर समितीकडून मोफत अन्नदान सुरु असून आज पालकमंत्री श्री गोरे यांच्या हस्ते दर्शन रांगेतील भाविकांना अन्नदान करण्यात आले. तसेच त्यांनी वारकरी भाविकांशी संवाद साधून उपलब्ध सुविधाबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी मंदिर समितीकडून वारी कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली तसेच भाविकांना सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य देण्यात आले असून दर्शन रांग द्रुतगतीने चालावी यासाठी ज्यादा सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
000000000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close