सेवानिवृत्त वेतन भिक नसून कायदेशीर हक्क आहे : प्रा.डाॅ.वामन साळवे


सांगली येथे डॉ.वामन साळवे यांचा सत्कार करताना मा.अंजुमन खान, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विलास चौथाई, मा.आमदार सुधीर दादा गाडगीळ, सांगली विधानसभा, संघटना अध्यक्ष मा.सुरेंद्र उर्फ बाळासाहेब पेंडूरकर आदी मान्यवर.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल –
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-१ १/०१/२०२५: शिवाजी विद्यापीठाचे (कोल्हापूर) माजी सिनेट सदस्य व आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ,जिनेवा ,( स्वित्झर्लंड )पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. वामन निंबाजी साळवे यांचा सांगली जिल्हा पेन्शननर्स असोसिएशनच्या वतीने (९ जानेवारीला) सांगली येथे सन्मान करण्यात आला. सेवा निवृत्त सेवक एकात्मता दिनानिमत्त सांगली येथील दैवज्ञ भवन येथे सांगली जिल्हा पेन्शनर्स संघटनेच्या सदस्यांनी पंचाहत्तर व नव्वद वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात करण्यात आला. सांगली जिल्हा पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळासाहेब पेंडूरकर यांनी पाहुणेंचे स्वागत करून प्रास्ताविक केले . प्रमुख पाहुणेंचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. आमदार श्री सुधीर दादा गाडगीळ, (सांगली विधानसभा मतदारसंघ) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ वामन साळवे यांनी सेवा निवृत्तधारकांच्या समस्या संबंधी विचार मांडले. कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले नंतर त्यास शासकीय नियमानुसार सेवा निवृत्त वेतन प्राप्त होते. सेवा निवृत्त वेतन भिक नसून कायदेशीर हक्क आहे. सातव्या वेतन आयोगाची माहे जानेवारी २०१६ पासून अंमलबजावणी करताना महाराष्ट्र शासन निरनिराळ्या प्रकारचे चुकीचे आदेश काढून कर्मचारी सेवा निवृत्त वेतनामध्ये तफावत निर्माण करीत आहे. सेवानिवृत्त धारकांना मिळणारे वेतन, सेवा निवृत्तउपादान, अंशराशिकरणचे लाभ, सेवानिवृत्त वेतन कालावधी इत्यादी सारख्या सेवा निवृत्त वेतनातील तरतूदींकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी ,सेवा निवृत्तकर्मचारी वर्गावर अन्याय होत आहे. त्यासाठी सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी संघटीत होऊन अन्याया विरुद्ध संघटनात्मक पातळीवर संघर्ष करणे आवश्यक आहे, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. साळवे यांनी मांडले. सेवा निवृत्त अल्प बचत अधिकारी अंजुमन खान यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता (जलसंपदा विभाग), विलास चौथाई यांनी मार्गदर्शन केले. सांगली जिल्हा कर्मचारी संघटना अध्यक्ष जे. के. महाडीक, , संघटनेचे कार्यवाह सदाशिव सुर्यवंशी, उपाध्यक्ष दिलीप पाटील, खजिनदार राजन औंधकर, ऑडिटर सुभाष पाटील, सौ नलिनी यतवाळे, सौ . मंजुळा साळे, श्रीमती सुलभा कट्टी, तालुके स्तरीय सर्व कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर भोई यांनी केले. भिमराव रावहटे यांनी आभारप्रदर्शन केले.



