वंचितचे उमेदवार सुशीलकुमार देगलूरकर यांना मतदारच देत आहेत आर्थिक मदत
वंचितचे उमेदवार सुशीलकुमार देगलूरकर मतदारच देत आहेत आर्थिक मदत
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
देगलूर / प्रतिनिधी:- प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून एकीकडे मोठे जनसमर्थन दाखविण्यासाठी पैसे देऊन भाडोत्री लोक आणले जात असताना आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर देखील दररोज मोठी उधळण होत असताना दुसरीकडे देगलूर मदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार देगलूरकर यांना मतदारांकडूनच भक्कम पाठिंबासह आर्थिक पाठबळ दिले जात आहे. नेतृत्वगुण अंगी असलेल्या व मध्यमवर्गीय कुटुंबातील सुशीलकुमार देगलूरकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत.प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार व अन्य धनाढ्य उमेदवार यांच्या तुलनेत सुशीलकुमार यांना प्रचार यंत्रणेसाठी लागणारा खर्च झेपणारा नाही ही बाब ग्रामीण भागातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर खानापूर, शहापूर व अन्य परिसरातील गोरगरीब व कष्टकरी नागरिकांनीच शे- पाचशे ते सात आठ हजार रुपयांची अशी अनेकांनी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करीत सुशीलकुमार देगलूरकर या तरुणाला नाउमेद होऊ दिले नाही.
राजकीय नेते, अभिनेते यांच्या सभांवर होणाऱ्या खर्चापेक्षा गोरगरीब लोकांकडून मिळणारी तोकडी आर्थिक मदत व भक्कम पाठिंबासह आपल्याला राजकीय व सामाजिक कार्य करण्यासाठी खूपच बळ देणारी असल्याचे सुशीलकुमार यांनी सांगितले. ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतमजूर, महिला हेच वंचित बहुजन आघाडीचे
प्रचारक असून त्यांच्या तोंडी प्रचारामुळेच आपल्याला अन्य गावातून देखील प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. वंचित आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हे प्रकृती कारणामुळे देगलूर येथे येऊ शकले नाहीत. सुजात आंबेडकर यांची मोठी सभा झाली. बौद्ध समाजाचा उमेदवार हवा अशी देगलूर मतदारसंघातील समाजबांधवांची मागणी लक्षात ठेवत प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यासारख्या चळवळीतील तरुणावर मोठा विश्वास टाकून वंचित आघाडीकडून सर्वप्रथम उमेदवारी घोषित केली.
प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग देगलूर बिलोली तालुक्यात आहे, तरुण कार्यकर्ते, नवमतदार आणि ग्रामीण भागातील कष्टकरी माझ्या पाठीशी असल्याने मी आश्वस्त असल्याचे देगलूरकर म्हणाले.