Uncategorized

समाजशिक्षक म्हणून भूमिका बजावताना स्वतःच्या पेशाशी प्रामाणिक राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला–सुनील अडगळे

यशस्वी सेवेची २० वर्ष पूर्ण...पुन्हा पुन्हा शिक्षक होणंच आवडेल

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-राष्ट्राचे भवितव्य असणाऱ्या चार भिंतीमधील विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आणि समाजात वावरत असताना आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय या नात्याने समाजशिक्षक म्हणून भूमिका बजावताना स्वतःच्या पेशाशी प्रामाणिक राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला याचा मला सार्थ अभिमान आहे…‌या खडतर वाटचालीत अनंत अडचणी आल्या,पण त्याला आनंदाने सामोरा जाऊन यशस्वी झालो.सत्याला असत्य ठरवण्याचा प्रयत्न जोराने चालू असतो.तो विंचवाचा गुण आहे..आपण संतमार्ग सोडायचा नसतो.आपण समाजाला योग्य दिशेने घेऊन जातोय..हा विचारच खूप प्रेरणादायी आहे.असा विश्वास सुनील अडगळे गुरुजी यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की,रानमळा-भोसे सारख्या छोट्या वस्तीवरील शाळेमध्ये सेवेची सुरुवात करत असताना लोकांचा विश्वास इतका संपादन केला की गुणवत्तेच्या जोरावरती “आता कसं ?”या शब्दावर सर्व पालक “गुरुजी, म्हणतील तसं..!!” असंच म्हणायचे. त्यामुळे पालकांच्या विश्वासावरती तीन टक्के गुणवत्ता असणाऱ्या शाळेचा ग्रामीण गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात “उत्कृष्ट शाळा”पुरस्कार प्राप्त झाला. या छोट्या व्दिशिक्षकी वस्तीवरील शाळेत स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते अविरत कष्टाच्या जोरावरती प्रत्येक वर्षी सलग सत्यात उतरून दाखवले. मा.मुख्याध्यापक बळी गुरुजी उर्फ बळीराम माळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा प्रचंड कायापालट झाला.हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच…!!


रानमळा शाळेतून जेव्हा बदली झाली तेव्हा लोकांनी स्वतःच्या खर्चाने शाळेच्या पटांगणात मंडप टाकला, प्रमुख पाहुणे आणि कृतज्ञ ग्रामस्थांच्या उपस्थितीत,सर्वांना स्नेहभोजन दिलं आणि संपूर्ण कपड्याचा आहेर देऊन येथोचित सन्मान करून मला निरोप दिला‌….!! ही माझ्यासाठी आयुष्यातील फार मोठी अविस्मरणीय भेट होती.
पुढे पांढरेवस्ती करकंब या तीन शिक्षकी छोट्या वस्तीवरील शाळेत बदली झाल्यानंतर देखील विद्यार्थी आणि शाळा घडवण्याची प्रचंड ओढ लागल्यामुळे शाळेला ‘एकही दिवस सुट्टी न घेता’ दिवाळी-उन्हाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करुन अखंडपणे तब्बल ५ वर्ष”३६५ दिवस शाळा “सुरू ठेवण्याचा विक्रम केला. लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला.याची दखल विविध वर्तमानपत्रे आणि “ABP माझा TV” या प्रसिद्ध चॅनेलने घेतली.शाळा आणि माझा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड नावलौकीक झाला….!! आडनावाप्रमाणे अडगळीतील माणूस प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आला..
पांढरे वस्ती शाळेतच एका वर्षी मी “स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकल्याशिवाय… पायात चप्पलच घाला नाही..!” अशी प्रतिज्ञा केली.वर्षभर उन्हाळ्या-पावसाळ्यात अनवाणी पायाने फिरत राहिलो,काम करत राहिलो.परंतु शेवटी जिद्दीला यश आलं.तीन विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत चमकले,दोन विद्यार्थी नवोदयला आणि एक विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनला पात्र झाला…!! या वेळेला मुख्याध्यापक मा.श्री.मोहन रसाळ सर आणि आदर्श गुणवान शिक्षक सुनिल बारेकर सर आणि पालकांचेही प्रचंड सहकार्य लाभले…
पुन्हा तिसऱ्या वेळेत माझ्या स्वतःच्या भूमीमध्ये भोसे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली.मला खूप आनंद झाला. ज्या वर्गात आपण शिकलो त्याच वर्गात शिक्षक म्हणून शिकवण्याची संधी मिळाली, या विचाराने भारावून गेलो, नवा हुरूप आला. गावासाठी कष्ट उपसण्याची, कोणतेही काम करण्याची तयारी सुरू केली. हा हा म्हणता पुन्हा एकदा पालकांचा विश्वास प्रचंड प्रमाणात वाढला. आम्ही दोघेही पती-पत्नी त्याच शाळेत असल्यामुळे सुट्टी दिवशीही शाळेत काम करण्याचा झपाटा आम्ही सुरू ठेवला. गुणवत्ता कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी ती झाकून राहत नाही. कोळशाच्या खाणीत हिरा लपवला तरी तो चमकतोच…. याप्रमाणे येथेही लोकसहभागाच्या जोरावरती विविध उपक्रम यशस्वीपणे राबवताना स्पर्धा परीक्षेमध्ये आणि विविध क्षेत्रात खूप विद्यार्थी चमकले. आज पुन्हा एकदा जि.प.शाळा जाधववाडी सारख्या आदर्श शाळेमध्ये आम्ही दोघेही पतीपत्नी शिक्षक म्हणून सेवा करताना.. क्षणोक्षणी मनामध्ये असणारा विद्यार्थी गुणवत्तेचा ध्यास, आयुष्य कृतकृत्य झाल्याचं समाधान देऊन जातो… !!!
वक्तृत्व,सामाजिक साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील शेकडो पुरस्कारांनी या काळात सन्मान झाला, ही माझ्यासाठी फार मोठी अनमोल संपत्ती आहे…
“घेतले न व्रत अंधतेने…”असे म्हणताना.. कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा पुन्हा शिक्षक होणंच आवडेल..कारण “अनंत अमुची ध्येयशक्ती..अनंत अन् अशा ..सागरा,किणारा तुला पामराला…” या काव्यपंक्तीप्रमाणे अंतिम विजय कष्टाचा, प्रामाणिकतेचा अणि सत्याचाच असतो.. या अढळ विश्वासाने…आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झाले…आपला सर्वांचा अतिशय नम्रतापूर्वक कायम ऋणी..
शब्दाकंन  -सुनिल अडगळे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close