श्रमसंस्कार शिबिरातून मिळणारे संस्कार विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जोपासावेत – पोलीस निरीक्षक धनंजय जाधव.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर – “युवक हा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. श्रमसंस्कार शिबिरातून युवकांना शारीरिक श्रमाची सवय लागते. श्रमातूनच नवनिर्मिती होत असते. देशाच्या नवनिर्माणासाठी अशा स्वरूपाची शिबिरे होणे गरजेचे असते. हा देश युवकांच्या श्रम, त्याग आणि बलिदानातून तयार झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शिबिरातून मिळणारे शिक्षण आणि संस्कार आयुष्यभर जोपासावेत.” असे प्रतिपादन पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने भाळवणी येथे ‘पंचवीस ते एकतीस मार्च’ या कालावधीत संपन्न होत असलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
धनंजय जाधव पुढे म्हणाले की, “महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना सुसंस्कार देण्यासाठी अनेक उपक्रम राबवविले जातात. त्यातील उपक्रमात विद्यार्थ्यांनी नेहमी सहभागी झाले पाहिजे. व्यक्तीमत्त्व विकास करण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असते. या शिबिरातून समूह भावना वाढीस लागते. निसर्गाविषयी नाते निर्माण होते. मित्रांच्या मध्ये मिसळता येते. नवनवीन कौशल्ये आत्मसात करता येतात. ज्ञानाबरोबरच श्रम आणि मनोरंजन याही बाबी शिकायला मिळतात. विद्यार्थ्यांनी गावाशी नाते टिकवून ठेवले पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “भारताची खरी संस्कृती ही खेड्यामध्ये आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खेडी बदलत आहेत. गावाकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या सण आणि उत्सवातून ही संस्कृती प्रवाहित होत असते. विशेष श्रम संस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना स्वयं शिस्त, श्रम संस्कार आणि व्यक्तिमत्वाचा विकास या बाबी शिकायला मिळत असतात.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. या उद्घाटन शिबिरास उपप्राचार्य प्रा.डॉ. तानाजी लोखंडे, मुख्याध्यापक नागनाथ गायकवाड, संभाजी शिंदे, भगवान चौगुले, विठ्ठलबापू चौगुले, पूनम दीपक गवळी, डी.एस. वाघमारे, संजय बाबर, राजश्री ताड, धीरज साळुंखे, नितीन शिंदे, प्रशांत माळवदे, डॉ. सुशील शिंदे, डॉ. दत्तात्रय चौधरी, डॉ. नवनाथ पिसे, डॉ. अमोल ममलय्या, प्रा. सुमन केंद्रे, डॉ. अनिस खतीब, प्रा. अमोल मोरे, डॉ. भारत सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार शकील काझी यांनी मानले.





