Uncategorized

पत्रकारांनी सामान्यांचा आवाज होणे आवश्यक – प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

 -श्रीकांत कसबे

पंढरपूर – “सध्याची प्रसार माध्यमे ही भांडवल दारांनी विकत घेतली असून ती राजकीय लोकांना विकली आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती ही अत्यंत बिकट बनली आहे. आज प्रत्येक ठिकाणी मालक शाही सुरु असून त्यांचे सरकारशी साटेलोटे
आहे. त्यामुळे सामन्यांचा आवाज दबला जात आहे. पत्रकारांनी
सर्वसामान्यांचा आवाज होणे आवश्यक आहे.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात प्रसिद्धी विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र पंढरपूर व इंटायर मास मिडिया आणि कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, संपादक शिवाजी शिंदे,उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य राजेश कवडे, कला विभागाचे
अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक युवराज अवताडे, परीक्षा नियंत्रक डॉ. राजाराम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. रवींद्र चिंचोलकर पुढे म्हणाले की, “पत्रकार हा
समाजातील महत्त्वाचा घटक असून त्याने नवीन गोष्टींचा शोध घेऊन त्याची बातमी बनविली पाहिजे. पत्रकारांच्यात खूप ताकद असते. पत्रकारांनी ठरविले तर राष्ट्राध्यक्षांनाही धडा शिकवू शकतात. पत्रकारांचे काम हे दिवसाचे चोवीस तास सुरु असते. आजच्या काळात पत्रकारितेला जे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ते त्यांनी बदलण्याचे धाडस दाखविले पाहिजे. आपल्या
बातमीला सामान्य माणसांच्या समस्यांची आस असेल तर नक्कीच त्याचा उपयोग समाजासाठी होवू शकतो. याचे भान सातत्याने ठेवले पाहिजे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत
खिलारे म्हणाले की, “पंढरपूर परिसरातील बहुतांशी पत्रकार हे या
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाविद्यालयाच्या वाढणाऱ्या नावलौकिकात पत्रकारांचेही योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. महाविद्यालयाच्या विकासाचा परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कामगिरी ही आमच्यासाठी कौतुकास्पद आहे.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्धी विभाग प्रमुख डॉ.
दत्तात्रय डांगे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. नितीन कांबळे
यांनी करून दिला. या कार्यक्रमावेळी संपादक शिवाजी शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, संपादक, वार्ताहर आणि बातमीदार यांचे सत्कार करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,
मुंबई यांच्यावतीने फेटा, शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देवून त्यांचा
सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, जुनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थितहोते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रविराज कांबळे, प्रा. संजय
जगदाळे, प्रा. राजेंद्र मोरे, प्रा. नानासाहेब कदम, अभिजित जाधव, अमोलvजगदाळे, अमोल माने, समाधान बोंगे, ओंकार नेहतराव, संजय मुळे, महेश सोळंके यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. दत्ता खिलारे यांनी मानले.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close