सुनिल अडगळे यांना राज्यस्तरीय समाज सन्मान पुरस्कार प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-आद्य गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२९ व्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलाक्रिडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मातंग विकास संस्था पुणे यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा ” राज्यस्तरीय समाज सन्मान पुरस्कार “ लोकमान्य टिळकांचे पणतू, टिळक विद्यापीठाचे कुलपती डॉ.दीपक टिळक यांच्या शुभहस्ते सुनिल अडगळे भोसे ता-पंढरपूर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी सुभाष जगताप,प्र.कुलगुरू डॉ.पराग काळकर,डॉ.प्रशम कोल्हे,डॉ. देविदास वायदंडे, .दादासाहेब सोनवणे,राजेश रासगे,तात्यासाहेब तुपसुंदर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे त्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करुन यथोचित सन्मान करण्यात आला.
फुले शाहू आंबेडकर शिवराय यांच्या विचारधारेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या आणि व्याख्यानांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून सामाजिक चळवळीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गणवेश वाटप, निराधारांना जीवन आवश्यक वस्तू,कपडे वाटप, वृक्षारोपण, ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेट वाटप, पुस्तके,रोपे वाटप, महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विधायक उपक्रमांनी साजऱ्या करताना विविध स्पर्धा आणि उपक्रम घेतले, सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान, गुणवंतांचा सत्कार,साहित्य संमेलनातून विचारमंथन,रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबरोबर “३६५ दिवस चालणारी शाळा”,”स्काॅलरशीपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी आल्याशिवाय चप्पल घालणार नाही.”ही प्रतिज्ञा,महाराष्ट्र शासनाच्या विभागीय गुणवत्ता विकास अभियानामध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी,वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना उत्कृष्ट गुणवत्ता ,स्कॉलरशिप परीक्षा,व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन,शालेय व सहशालेय उपक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले.लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळांचा विकास केला.
त्यांना आजपर्यंत शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अशा विविधांगी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवरांनीही त्यांचे शूभचिंतन केले.


