हमाल-मापाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द-सभापती सुशील आवताडे
जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत हमाल-मापाडी कामगारांची बैठक संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
। मंगळवेढा, प्रतिनिधी
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काम करणार्या हमाल-मापाडी कामगारांची माथाडी बोर्डात नोंदणी करून माथाडी बोर्डाकडून मिळणार्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच हमाल-मापाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील बबनराव आवताडे यांनी केले.
सोलापूर जिल्हा हमाल-मापाडी पंचायतीने मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित केलेल्या हमाल-मापाडी कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी हमाल-मापाडी कामगारांचे प्रश्न अनेक आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक हमाल-मापाडी कामगार हा माथाडी बोर्डात नोंदित झाला झाला पाहिजे, त्यांचे पगार माथाडी बोर्डातूनच झाले पाहिजेत. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या आवारातील प्रत्येक व्यापारी व आडत्यांनी हमाल-मापाडी कामगारांचे पगार रोख न देता ते माथाडी बोर्डातच भरावेत. यासाठी बाजार समितीने मदत करणे गरजेचे आहे. सभापती सुशील आवताडे यांनी यापुढे सर्व हमाल-मापाडी कामगारांचे पगार माथाडी बोर्डातूनच केले जातील असे आश्वासन आपणास दिले आहे. त्यामुळे भविष्यात हमाल-मापाडी कामगारांना माथाडी बोर्डातील सुविधा मिळणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले.
यावेळी मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिन देशमुख, हमाल पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमा सिताफळे, जिल्हा सचिव संतोष सावंत, सिध्दू हिप्परगी, सुनिता पोटे, मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल-मापाडी कामगार प्रतिनिधी प्रविण कोंडुभैरी, राहुल नागणे, रोहित सकट, पांडुरंग जाधव, तुकाराम चौगुले, आशिष मुल्ला, विठ्ठल डोईफोडे आदी उपस्थित होते.