राज्यस्तरीय” अण्णाभाऊ साठे जन्मभूमी “पुरस्कार प्रा. शरद गायकवाड यांना प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
कोल्हापूर , दि-6 येथील महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असणारे प्राध्यापक, साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद गायकवाड यांना नुकताच अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील जन्मभूमीत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच ‘राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे जन्मभूमी पुरस्कार’ अण्णाभाऊंच्या सुनबाई सावित्रीबाई साठे व अण्णाभाऊंचे नातू सचिन भाऊ साठे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ.शरद गायकवाड यांनी विद्यापीठ स्तरावर ‘शंकर भाऊ साठे यांच्या 16 कादंबऱ्या व माझा भाऊ अण्णा भाऊ’ या समग्र साहित्यावर महाराष्ट्रात सर्वप्रथम विद्यापीठ स्तरावर 1997 मध्ये एम.फील. चा शोध प्रबंध सादर केला.
त्यानंतर ‘मातंग समाजाचा अडीच हजार वर्षांचा अभ्यास ‘करून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘मराठी साहित्यातील मातंग समाज‘ या विषयावर पीएच.डी. पदवी 2008 मध्ये मिळवली .
आजपर्यंत डॉ. शरद गायकवाड यांचे 13 संशोधनात्मक ,वैचारिक ग्रंथ प्रकाशित असून डॉ.शरद गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर थायलंड, (बँकॉक ),रशिया (मास्को), मलेशिया, दुबई ,भूतान आणि श्रीलंका येथील (कोलंबो) विद्यापीठांमध्ये बुद्ध, फुले, शाहू ,आंबेडकर ,लहुजी साळवे आणि अण्णा भाऊ साठे या महापुरुषांच्या युगप्रवर्तक कार्यतत्वज्ञानाचा आपल्या संशोधनात्मक व्याख्यानांद्वारे प्रसार आणि प्रचार केलेला आहे .
त्यासोबतच पोतराजांचे जटा निर्मूलन ,व्यसनमुक्ती अभियान, धर्मनिरपेक्षता, संविधान जागृती यावर त्यांनी गेली 30 वर्षात महाराष्ट्रभर फिरून व्याख्यानांद्वारे समाज प्रबोधन केलेले आहे व करीत आहेत.
डॉ. शरद गायकवाड यांनी अनेक आंदोलनांच्याद्वारे , मोर्चाद्वारे बहुजन दलित शोषित मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध रस्त्यावरची लढाई सुद्धा लढलेली आहे.
डॉक्टर गायकवाड यांच्या या समग्र कार्य -कर्तृत्वाचा विचार करूनच आजवर त्यांना राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे एकूण 26 पुरस्कार मिळालेले असून अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी, अण्णाभाऊंच्या जन्म गावी, अण्णा भाऊंच्या वारसदारांच्या हस्ते नुकताच प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मभूमी पुरस्कार’ त्यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे .
त्यांच्या या पुरस्काराबद्दल महावीर महाविद्यालयाच्या ‘आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळा’चे चेअरमन एडवोकेट -के. ए.कापसे साहेब, सेक्रेटरी -मोहन गरगटे, महाविद्यालयाचे प्राचार्य -डॉ. राजेंद्र लोखंडे तसेच डॉ .गायकवाड यांचे वैचारिक गुरु -डॉ. आ.ह .साळुंखे ,हरी नरके, रावसाहेब कसबे ,साहित्यिक उत्तम कांबळे इत्यादी मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.


