Uncategorized

संसद व विधीमंडळात महिलांसाठी जागा आरक्षित असाव्यात – प्रा.डॉ.सोमनाथ कदम

'जागर संविधानाचा' व्याख्यानमाला'पुष्प बारावे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

वाशिम:-.08/01/2023
मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम चा उपक्रम
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित व प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळ तोंडगाव द्वारा संचलित
मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानावर प्रकाश टाकण्यासाठी ‘जागर संविधानाचा’ या व्याख्यानमालेचा कार्यक्रम दि.26 नोव्हेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला आहे. दर आठवड्यातील शनिवार व रविवार या दिवशी भारतीय संविधानातील 22 भागातील एका एका भागावर मार्गदर्शन होत आहे.
या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प दिनांक 08 जानेवारी 2023 रोजी प्रा.डॉ.सोमनाथ कदम , इतिहास विभाग प्रमुख, कणकवली महाविद्यालय, कणकवली यांनी गुफंले. बाराव्या पुष्पा मध्ये भारतीय संविधानातील भाग पंधरा आणि सोळा – निवडणुका आणि विविध वर्गासंबंधीच्या विशेष तरतुदी या भागांवर प्रकाश टाकला.
भारत हा जगातील सर्वात मोठी व प्रगल्भ लोकशाही असणारा देश आहे. भारतीय संविधानाने मजबूत चौकट निवडणुकीच्या अनुषंगाने निर्माण केली आहे. भारतीय संविधानातील एकंदरीत लोकशाहीमध्ये निवडणुकांना अत्यंत महत्त्व आहे कारण लोकप्रतिनिधींना लोकांनी आपल्या मतदानाच्या अधिकाऱ्याद्वारे निवडून द्यावयाचे असते. निवडणूक प्रक्रिया जेवढी पारदर्शक असेल तितके लोकशाहीसाठी चांगले असते. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये मतदानाचा अधिकार वेगवेगळ्या पद्धतीने मिळाला परंतु भारत हा एक जगातील असा देश आहे की सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार एकाच वेळी समान पद्धतीने मिळाला आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाला अत्यंत महत्त्व असून मतदार हा राजा असतो. भारतातील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र पातळीवर केंद्रीय निवडणूक आयोग तर राज्य पातळीवर राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आले आहेत.घटनात्मक दृष्टीने हे आयोग निपक्षपाती असतात. त्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कामा केले पाहिजे परंतु आज निवडणूक आयोगावर सुद्धा राजकीय दबाव टाकल्याचे जाणवत आहे. टि.एन शेषण सारखे निवडणूक आयुक्त ज्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बदल केले असे आयुक्त लाभणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इथल्या शोषित वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने भारतीय संविधानामध्ये आरक्षणविषयक तरतुदी केल्या. संसद व विधिमंडळात अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात काही मतदारसंघ राखीव ठेवले. परंतु आजही भारतातील महिलांसाठी अशा प्रकारच्या स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद नाही त्याचे कारण वर्षानुपरंपरेने चालत आलेली पुरुषी मानसिकता हे आहे येणाऱ्या काळामध्ये ही मानसिकता बदलून महिलांना सुद्धा राजकीय प्रक्रियेमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. भारतीय राजकारण जात, धर्म व भावनेवर केले जाते ते लोकशाही साठी धोक्याचे ठरते. राजकीय पक्ष याचा गैरफायदा घेतात. लोकशाहीमध्ये निवडणुका व मतदान याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यामुळे प्रत्येक भारतीयाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे सोबतच आपली स्वविवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान केलं पाहिजे असे आवाहन सुद्धा डॉ. कदम यांनी केले.
सदर व्याख्यानमालेचे प्रास्ताविक , आभार प्रदर्शन आयोजक प्रा.डॉ.विलास गायकवाड यांनी केले. सदर व्याख्यानाला महाराष्ट्रातील संविधानाचे अभ्यासक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close