मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या चुकीचे खापर पोलीस कर्मचारी व पत्रकार यांच्यावर फोडू नये – श्रीकांत शिंदे
पंढरपुरात सर्वपक्षीय नेत्यांंनी केले तोंडाला काळी पट्टी बांधून मुक आंदोलन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेतालपणे बोलताना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चुकीचे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्या वक्तव्याच्या निषेधार्थ दलित चळवळीतील एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ 11 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले व न्यूज 18 लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे स्वतःच्या चुकीचे खापर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार व पोलीस कर्मचाऱ्यांवर फोडत आपल्या चुकीच्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आज सोमवारी सर्वपक्षीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून व हातात फलक घेवून मुक आंदोलन पंढरपुरातील डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे म्हणाले की, गोध्रा हत्याकांडमध्ये आरोपी म्हणून विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अटक केलेल्या आय.पी. एस. संजीव भट यांना अजूनही कारावास मध्ये डांबून ठेवले आहे मग भाजपाला महाराष्ट्राचा गुजरात करायचा आहे का ? चूक नसतानाही निलंबन केलेल्या पोलीस कर्मचारीचे निलंबन मागे घ्यावे अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा राज्य प्रवक्ते रणजित बागल म्हणाले की, राज्यात अघोषित आणीबाणी सुरू आहे, एकिकडे महापुरूषांबाबत अवमानकारक विधाने करायची नंतर त्याबाबत शाईफेक झाली की पोलिस बांधवांवर कारवाई करायची हा कुठला न्याय. ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे अशी आक्रमक टीका त्यांनी भाजप सरकारवर केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रिपब्लिकन सेनेचे प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर गायकवाड,राष्ट्रवादी उद्योग व्यापार आघाडीचे तालुकाध्यक्ष उमेश सासवडकर,शिवसेना ठाकरे गटाचे उप शहरप्रमुख तानाजी मोरे,स्वप्निल गावडे,राष्ट्रवादीचे दादा थिटे, संतोष बंडगर,निलेश कोरके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.