बहुजनांना एकत्र करण्याची डॉ.बाबासाहेबांची भूमिका होती – डॉ. सुरेश वाघमारे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि मातंग समाज' पुस्तकाचे प्रकाशन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक श्रीकांत कसबे
लातूर (वार्ताहर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक परिवर्तनाची चळवळ ही सम्यक समाज घटकांच्या हिताची चळवळ होती. संपूर्ण बहुजन समाजाला समाजाला एकत्र करण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. कोणाच्याही शिकवणुकीने आपसात बेकी होऊ देऊ नका हा बाबासाहेबांचा संदेश आजही महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी केले.
येथील सम्यक समाज संघाच्या वतीने प्रा.सोमनाथ कदम यांनी संपादित केलेल्या आंबेडकरी “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि मातंग समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन विक्रम नगर येथील ज्ञानसाधना वाचनालयाच्या सभागृहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश वाघमारे होते.
याप्रसंगी मंचावर लसाकमचे नियंत्रक नरसिंग घोडके, सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष डी.एस. नरसिंगे सम्यक समाज संघाचे अध्यक्ष एडवोकेट मंचकराव डोणे व लसाकम महासचिव राजकुमार नामवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सुरेश वाघमारे यांनी अण्णा भाऊ साठे यांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे ‘एकजुटीच्या रथावरती! आरूढ होऊनी चल बा पुढती! हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा मतितार्थ होता असे स्पष्ट केले.
याप्रसंगी लेखक डॉ. सोमनाथ कदम यांनीही ग्रंथ निर्मिती विषयीची भूमिका स्पष्ट केली. प्रबोधनाचे वारसदार, मातंग समाजाचा इतिहास, विसाव्या शतकातील मातंग समाज, आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज, अण्णा भाऊ साठे साहित्य आणि तत्त्वज्ञान, मुक्ता साळवे जीवन आणि कार्य , संत रोहिदास जीवन आणि कार्य ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि मातंग समाज या पुस्तकाचे प्रकाशन कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद यांनी केले असून बहुजन समाजात आंबेडकरी विचारधारा पेरणारे जी.एस. दादा कांबळे यांना हे पुस्तक समर्पित करण्यात आले आहे.
यावेळी नरसिंग घोडके यांनी मातंग समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळी विषयी भाष्य करताना बाबासाहेबांचे विचारच मातंग समाजाला पुढे घेऊन जाणारे असल्याचे सांगितले. तर डी एस नरसिंगे यांनी ओबीसी व मातंग समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची भूमिका समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
सम्यक समाज संघाचे अध्यक्ष अँड. मंचकराव डोने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ओबीसी समाजात प्रसारित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा अभिवादन करण्यात आले.राजकुमार नामवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राहुल गायकवाड व भरत सूर्यवंशी यांनी केले व शेवटी सर्वांचे आभार मधुकर दुवे यांनी मानले.