आदर्श लाईफ वर्कर पुरस्काराने प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर –येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांना नुकताच दिवंगत शंकरराव कोल्हे आदर्श लाईफ वर्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सातारा येथे कर्मवीर समाधी परिसरात डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या समारंभात ‘रयत’ संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी रयत शिक्षण संस्थेत आठरा वर्षे प्राध्यापक म्हणून व आठरा वर्षे प्राचार्य म्हणून काम केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळून त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये सिनेट सदस्य, अकॅडमिक कौन्सिल मध्ये
राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच पुणे विद्यापीठात शास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्य केलेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विविध समितीवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या अनेक दुर्बल शाखांच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावला आहे. दहिवडी महाविद्यालय दहिवडी, राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय कोल्हापूर या महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनात ए ग्रेड मिळवून देण्यासाठी विशेष कार्य केले आहे. बळवंत कॉलेज विटा, एस.एम. जोशी महाविद्यालय हडपसर पुणे या महाविद्यालयाच्या विकासासाठी बहुमोल काम केले
आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकास शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण केले आहे. प्रत्येक महाविद्यालय आणि तेथील विद्यार्थी यांची गरज लक्षात घेवून त्यांनी खूपच चांगल्या प्रकारचे योगदान दिले आहे.
त्यांच्या अशा विविध स्वरूपाच्या कार्याची दखल घेवून त्यांना सन दोन हजार सतरामध्ये माण पत्रकार संघाच्या वतीने ‘आदर्श प्राचार्य’, सन दोन हजार आठरामध्ये माणदेश फौंडेशन पुणे यांनी ‘आदर्श प्राचार्य’ या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागाच्या गरजा लक्षात घेवून
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांना रोजगाराभिमुख
शिक्षण देण्यासाठी ठोस स्वरुपात धोरण निश्चित करणार असल्याचे व ते अमलात आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून
त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.