Uncategorized

वारकरी भाविकांच्या सोयीसुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यात्रेपूर्वी पाहणी करणारे, अडचणी जाणून घेणारे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान - आरोग्य महाशिबिर, मंदिर, पत्राशेड, ६५ एकरची केली पाहणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

:-श्रीकांत कसबे

पंढरपूर, दि. 25 (उ. मा. का.) : आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात. त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाला नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, वारकरी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर श्री. शिंदे यांनी आज पंढरपूर येथील विविध ठिकाणी भेट देऊन यात्रेच्या पूर्वतयारीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी श्री. शिंदे यांनी गोपाळपूर येथील महाआरोग्य शिबिर, पत्रा शेड, श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदिर, ६५ एकर या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. यात्रेपूर्वी पाहणी करणारे आणि वारकरी भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणणारे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी आदिंसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 29 जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या मॅट, स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये आदि सुविधा तसेच, महिला भाविकांसाठी देण्यात सुविधांसह अन्य आवश्यक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.

गत महिन्यात घेण्यात आलेल्या नियोजन बैठकीत यावर्षीची आषाढी वारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे, वारकरी सांप्रदायाची कुठल्याही प्रकारची गैरसोय, अडचण होता कामा नये, अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या. नियोजनात त्रृटी राहणार नाहीत, यासाठी आपण स्वतः पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. शिंदे यांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी – सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या सूचना केल्या. दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून मंडप उभा केला आहे. पंख्यांची व्यवस्था केली आहे. यामुळे त्यांचे ऊन – पावसापासून संरक्षण होईल, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, एसटीच्या जादा गाड्या, वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पथकर माफी अशा सुविधांसह यावर्षी वारकऱ्यांचा प्रथमच विमा काढला आहे. तसेच, वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. पोलिसांनी देखील भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली आहे.
65 एकर येथे वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, येथील वारकऱ्यांना मुबलक व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी, पावसाळ्यामुळे चिखल होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या ठिकाणी मुरूमीकरण करावे, 65 एकर पुढील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
तसेच, 65 एकर येथील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे भेट देऊन उपचार घेत असलेल्या रुग्णाची विचारपूस केली.
श्री विठ्ठल रूक्मिणीचे घेतले दर्शन
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले व मंदिर समितीमार्फत भाविकांना श्री विठ्ठलाचे सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबत माहिती दिली. याबद्दल मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
वारकऱ्यांशी साधला संवाद
आपण भाग्यवान आहोत, कि आषाढी वारीची पूजा करण्याचे भाग्य आपणास लाभले आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी पत्रा शेड येथील दर्शन रांगेत वारकरी भक्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. वारकऱ्यांनी मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले, पंढरपुरात वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत हे पाहून समाधान वाटत आहे. वारकरी संपूर्णपणे खुश आहेत, असे ते म्हणाले.

00000

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close