शिवस्वराज्य स्थापनेत सर्व जाती धर्मियांचे योगदान महत्त्वपूर्ण होते – प्रा.डॉ. प्रदीप जगताप
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिवस्वराज्य दिनाचे करण्यात आले आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे केवळ धर्माचे राज्य नव्हते. त्यांची लढाई ही धर्मावर आधारित नव्हती. तर राजकीय स्वरूपाची होती. हल्ली अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्ष हे शिवाजी महाराज मुस्लीम द्वेष्टे असल्याचे एकांगी चित्र निर्माण करतात. परंतु ते खरे नाही. शिवाजी महाराज यांनी रयतचे राज्य निर्माण केले होते. त्या
राज्याच्या निर्माणासाठी अनेक मुस्लीम सरदार आणि सैनिकांनी योगदान दिले होते. राजांचे एकूण एकतीस अंगरक्षकामध्ये दहा अंगरक्षक मुस्लीम तर तीस टक्के सैनिक मुस्लीम होते. स्वराज्याच्या स्थापनेत मुस्लिमांचे योगदान
महत्त्वपूर्ण राहिले आहे. सामाजिक न्याय, चारित्र्य संपन्नता, उदारमतवाद व स्त्री आदर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वा मधील महत्त्वाचे गुण होत.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रदीप जगताप यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील
स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिवस्वराज्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘शिवाजी महाराजांची धर्मनीती’ या
विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. चांगदेव
कांबळे हे होते.
डॉ. प्रदीप जगताप पुढे म्हणाले की, “शिवाजी महाराज यांनी
जाती आणि धर्मा मध्ये कधीही भेदभाव केला नाही. स्पृशा-अस्पृश्यता पाळली नाही. शिवाजी महाराज हे धार्मिकवृत्तीचे होते मात्र धर्मांध नव्हते. त्यांनी आपला धर्म व्यक्तिगत पातळीवर सांभाळला. स्वराज्याच्या निर्मितीसाठी धर्म निरपेक्ष धोरण स्वीकारले. म्हणूनच त्यांचे राज्य हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष व लोकशाहीला पूरक असे होते. त्यांनी आपल्या
प्रत्येक सैनिकासाठी ‘मावळा’ हा शब्द वापरला. शिवाजीचा मावळा हा सर्वव्यापक होता.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चांगदेव कांबळे म्हणाले
की, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामायण आणि महाभारत यामधील अनेक कथा
वाचून आणि ऐकून आपले व्यक्तीमत्त्व घडविले. माँसाहेब जिजाऊ यांच्या
मार्गदर्शनाखाली स्वराज्याची स्थापना केली. . दळणवळणाची अपुरे साधने असताना देखील त्यांनी कौशल्ये
वापरून स्वराज्याची निर्मिती केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे
प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. तर प्रमुख
पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी करून दिला. या कार्यक्रमास सिनिअर विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सुमन केंद्रे यांनी मानले.