“कर्मवीर”मध्ये इंग्रजी विषयाची राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न
इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

उद्घाटक प्रभाकर कोळेकर मार्गदर्शन करताना
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर: रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील. स्वायत्त महाविद्यालयात ‘इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली.
महाविद्यालयातील इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने, रुसा कॉम्पोनंट आठ अंतर्गत श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा व शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज यांच्यातील सामंजस्य करारानुसार ही कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, ‘एकविसाव्या शतकामध्ये इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी कष्ट आणि भाषा कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच इंग्रजी साहित्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.” उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे यांनी भूषविले. या कार्यशाळेत एकूण १३० प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
डॉ. प्रभाकर कोळेकर पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी प्रथमतः आपल्या मनातील इंग्रजी भाषेची भीती काढून टाकणे गरजेचे आहे. इंग्रजी भाषा आत्मसात करण्यासाठी इंग्रजीचे वाचन करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर स्मार्टफोनचा विधायक वापर इंग्रजी शिकण्यासाठी करावा.”
प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ‘विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आणि साहित्य यांच्या अभ्यासाचे महत्व विषद केले. भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय ठेवून मार्गक्रमण केल्यास आयुष्यात नक्कीच यश मिळेल याची खात्री असल्याची माहिती दिली.’
या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील माजी इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफे. डॉ. ए. एम. सरवदे यांनी बिजभाषक म्हणून इंगजी विषयातील विद्यार्थी व उपस्थित प्राध्यापक यांना शिक्षण, संशोधन आणि माध्यमातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, प्रथम सत्रामध्ये, डी. जी. कॉलेज सातारा येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. गणेश जाधव यांनी इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये असलेल्या व्यावसायीक संधी बद्दल माहिती दिली. कर्नाटक केंद्रीय विद्यापीठातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. प्रकाश बलीकई यांनी आय. टी., बँकिंग आणि सिविल सर्विसेस या क्षेत्रातील विविध संधी बाबत दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे, श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढाचे प्राचार्य डॉ. एन. बी. पवार यांनी इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना असलेल्या विविध वीस क्षेत्रातील संधी याबाबत मौलिक मार्गदर्शन केले. समारोप समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जे. साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करियरचे महत्व विषद केले.
कार्यशाळेच्या सुरुवातीलाच इंग्रजी विभागप्रमुख व कार्यशाळा समन्वयक डॉ. समाधान माने यांनी कार्यशाळेचे औचित्य विषद करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. अनिस खतीब यांनी केले तर डॉ. धनंजय साठे यांनी आभार मानले. विविध सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. ए. आर. मासाळ, डॉ. पी. जे. रुपनर, प्रा. उत्तम सावंत यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेस महाविद्यालयाचे तिन्ही विद्याशाखेचे उप-प्राचार्य आणि अधिष्ठाता डॉ. टी. एन. लोखंडे, डॉ. बी. बी. शितोळे, डॉ. सौ. एल. के. बागल, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. अमर कांबळे आणि रुसा समन्वयक डॉ. योगेश पाठक व डॉ. सी. एन. काळे उपस्थित होते. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इंग्रजी विषयातील प्राध्यापक डॉ. धनंजय साठे, प्रा. धनंजय वागदरे, प्रा. सुहास शिंदे, प्रा. परमेश्वर दुधाळ, डॉ. अनिस खतीब, प्रा. कुबेर गायकवाड, ऑफिसप्रमुख श्री. राजेंद्र गायकवाड श्री. अभिजित जाधव, श्री. गोविंद धावडे यांनी परीश्रम घेतले.