Uncategorized
अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस शाखा पंढरपूरच्या आंदोलनामुळे पंढरपूर नगरपरिषदेस मिळणार 9 कोटी 42 लाखांची थकीत रक्कम
कोरोनामुळे मयत झालेल्या 2 कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार 50 लाख रूपये

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस शाखा पंढरपूरच्यावतीने पंढरपूर नगरपरिषदेस वेतनापोटी मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानाची थकीत रक्कम रूपये 9 कोटी 42 लाख 60 हजार रूपये मिळणेबाबत शासनाकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केले होते त्यानंतर 2/11/2020 रोजी दिवाळी सणामध्ये संघटनेच्यावतीने आंदोलनही झाले होते. या आंदोलनाची दखल घेवून मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषदेमध्ये अधिवेशनामध्ये प्रश्न ही उपस्थित केला होता. त्यानंतर मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधानसचिव वित्त विभाग, नगरविकास विभाग, आयुक्त तथा संचालक सहाय्यक नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी या सर्वांना दि.2/3/2021, 12/10/2021 व कार्तिकी यात्रेमध्ये शासकीय महापुजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आले असता त्यांनाही निवेदन दिले होते. त्यावेळी अजितदादांनी त्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. पण या निवेदनाची शासनाकडून दखल घेतली जात नव्हती त्यामुळे संघटनेच्यावतीने दि.29/3/2022 रोजी वरील सर्व मान्यवरांना नगरपरिषदेची थकीत रक्कम 9 कोटी 42 लाख 60 हजार रूपये जमा करा अन्यथा दि.11/4/2022 पासून संघटनेच्यावतीने सत्याग्रह आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन दिले होते. सदर निवेदनामध्ये पंढरपूर नगरपरिषदेला शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानाची रक्कम प्रत्येेकवेळी कमी मिळल्याने नगरपरिषद पंढरपूरने न.पा.फंडातून 9 कोटी 42 लाख 60 हजार रूपये रक्कम अदा करून कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतन दिलेले आहे. त्यामुळे नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. गेल्या दोन वर्षापासून दिवाळीमध्ये शिमगा करावा लागत आहे. नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शासनाने जाहीर केलेला सातव्या वेतनाचा फरक, महागाई भत्ता गेल्या दोन वर्षापासून जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना निवृत्ती नंतरच्या हक्काच्या रकमा ग्रज्युईटी, हक्क रजेचा पगार अद्यापपर्यंत दिला गेला नव्हता म्हणून या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दवाखाना, घरातील लग्न कार्यामध्ये व्याजाने पैसे काढून आपला प्रपंच भागवत आहे या सर्व गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नगरपरिषदेची थकीत रक्कम अदा करावी.अन्यथा दि.11/4/2022 पासून बेमुदत सत्याग्रह आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची नोटीस दि.29/3/2022 रोजी मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान सचिव वित्त विभाग, नगरविकास विभाग, आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांना दिल्यानुसार काल 11/4/2022 रोजी आंदोलन सुरू झाले होते. यावेळी नगरविकास विभागात दुरध्वनीद्वारे संपर्क केल्यावर 400 कोटी रूपये नगरपरिषद प्रशासन वरळी यांच्याकडे वर्ग केल्याची माहिती दिली. आपण आयुक्त साहेबांशी संपर्क करा असे सांगितले. त्यानंतर मा.कानाडे साहेब उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय वरळी यांच्याबरोबर दुरध्वनीद्वारे संपर्क केल्यावर आंदोलनाची पूर्ण माहिती त्यांना दिली. सदर थकीत रकमाबाबत विशिष्ट प्रकारामध्ये त्याची माहिती समाविष्ट करण्याबाबत राज्यातील सर्व नगरपरिषदेकडे मागितली आहे. नंतर थकीत रक्कम राज्यातील सर्व नगरपरिषदांना मे महिन्याअखेरपर्यंत वर्ग करणार असल्याचे आश्वासन दिले व आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस शाखा पंढरपूर तालुकाध्यक्ष गुरू दोडिया यांनी दिली.
तसेच शासन निर्णयानुसार कोरोना महामारीमध्ये मृत्यू पावलेले कै.पोपट जाधव व कै.औदुंबर देशपांडे यांच्या वारसांना 50 लाख रूपयांची मदत मिळावी याबाबत संघटनेच्यावतीने मागणी केली होती व नगरपरिषदेनेही या दोघांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता मा.उपायुक्त साहेबांनी माहिती दिली की राज्यामध्ये 114 अधिकारी व कर्मचारी हे कोरोना काळात सेवा करताना मृत्यूमुखी पडलेले आहेत. त्यांना 50 लाख रूपयांची मदत देण्यासाठीचे आदेश देवून 31 मार्च 2022 रोजी आम्ही सर्व नगरपरिषदांना अनुदान वितरीत केलेले आहे. तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दि.5/4/2022 पर्यंत थेट खात्यात सानुग्रह अनुदान वितरीत करून तसा अहवाल संचालनालयाकडे सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती मा.उपायुक्त कानाडे साहेब यांनी दिली. आत्ता मे महिन्यापर्यंत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाचा फरक, महागाई भत्त्त्याचा फरक, सेवानिवृत्त कर्मचारी ज्यांच्या हक्काच्या रकमा, ग्रज्युईटी, हक्क रजेचा पगार मिळणार त्यामुळे सदर आंदोलन स्थगित केले व मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांचे आभार मानले.






