रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा त्याग रयत सेवक कधीही विसरणार नाहीत – प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा सिंहाचा वाटा होता. रयत च्या उभारणीत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले. त्यांचे उत्तरदायित्त्व निभावण्याचे कार्य कर्मवीरांना करता आले. मात्र लक्ष्मीबाईचे उत्तरदायित्व निभावता आले नसल्याची खंत कर्मवीरांच्या मनात अखेर पर्यत राहिली. आपल्या अंगावरचे मंगळसूत्र सुध्दा त्यांनी वसतीगृहातील मुलांच्या जेवणासाठी हसत हसत खर्ची टाकले. त्यांचा त्याग रयत सेवक कधीही विसरणार नाहीत. रयतच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या मुळाशी लक्ष्मीबाई यांचे अश्रू आणि त्याग यांचे खत आहे. हे आपणास विसरता येणार नाही.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व समारंभ समिती यांच्या वतीने ‘रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगोला येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे हे होते. यावेळी मंचावर पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, डी.व्ही.पी. उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, डॉ. राजेंद्र जाधव, सुभाषआबा सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे पुढे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्था ही समाजातील ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्त्व करते. समाजातील उपेक्षित , वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांची स्वप्ने साकार व्हावीत, त्यांना उच्च पदाच्या जागा संपादित करता याव्यात. यासाठी अतिशय कमी फीमध्ये शिक्षण उपलब्ध करून देते. रयतचे नेतृत्व करणारी अनेक जाणती माणसे काळाच्या ओघात निघून जात असताना त्यांची पोकळी कशी भरून काढणार हा प्रश्न आपल्या सर्वा समोर आहे. रयत ने सामाजिक बांधिलकी शिकवली असल्याने तो वारसा सेवकांनी पुढे नेला पाहिजे. ‘रयत’चा स्वतंत्र पँटर्न निर्माण व्हावा. यासाठी सेवकांनी अधिक मेहनत घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. नानासाहेब लिगाडे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत ‘कमवा आणि शिका’ या योजनेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेने गोर, गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटवून टाकून त्यांना नोकरीची शाश्वत संधी उपलब्ध करून दिली. असंख्य लोकांचे संसार उभे केले. गावोगावच्या लोकांनी ही संस्था मोठी करण्याचे कार्य केले. म्हणून रयत सेवकांनी ही संस्था जपली पाहिजे. संस्थेच्या मालमत्तेचे संरक्षण केले पाहिजे. जगात सर्वात जास्त प्रतिष्ठा ही शिक्षकांना असते. म्हणून त्यांनी ती अधिक जबाबदारीने पेलली पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय समारंभ समितीचे प्रमुख डॉ. दत्ता डांगे यांनी करून दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, सेवानिवृत्त सेवक वाय. एन. माने, सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम आदी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. प्रशांत नलावडे यांनी मानले.
……………………………………………………………………….