ग्राम स्वच्छते’ची सवय ग्रामस्थांनी अंगीकारावी- फुलचंद नागटिळक

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस अभिवादन करताना मान्यवर

फुलचंद नागटिळक मनोगत व्यक्त करताना
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – “ग्राम स्वच्छ्ता हा गावाच्या विकासातील महत्त्वाचा भाग असून आपल्या गावाला समृद्धी आणि विकासाच्या टप्प्यावर घेवून जाण्यासाठी स्वच्छतेची सवय लोकांनी अंगिकारली पाहिजे. संत गाडगेबाबा यांनी गावातील घाण साफ करता करता लोकांच्या मनातील अंधश्रद्धेची अस्वच्छता दूर करण्याचे काम केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या शिबिरात विद्यार्थ्यासोबतच ग्रामस्थांनी सहभाग दिला तर गावाला वैभव प्राप्त होईल.” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते फुलचंद नागटिळक यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत मौजे भाळवणी ता. पंढरपूर येथे संपन्न होत असलेल्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’त तिसऱ्या दिवसाच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ‘ग्रामस्वच्छता व जनतेचा सहभाग’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. डॉ. दत्ता डांगे हे होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, दामाजी शिक्षण संस्थेचे सचिव किसनराव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
फुलचंद नागटिळक पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन करावी. अधिकार पदाच्या जागा मिळवाव्यात. शाळा महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच निसर्गातील शिक्षण ही आत्मसात करावे. सामान्य जनतेशी नाते टिकवून ठेवावे. माता आणि माती यांच्याशी असणारे नाते दृढ करावे. श्रमाची लाज बाळगू नये. पुस्तकांचे वाचन करता करता माणसे वाचता आली पाहिजेत. असे ज्ञान आणि कौशल्ये विद्यार्थ्यांनी विकसित केले पाहिजे.”

प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विद्यार्थ्यांना ‘अशा’ स्वरूपाची बौद्धिक मेजवानी मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून स्वत:चा व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा. शारीरीक श्रमासोबत बौद्धिक श्रम विद्यार्थ्यांनी करावेत. निसर्ग आणि समाज यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता येतात. त्या विद्यार्थ्यांनी आत्मसात कराव्यात.”

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. दत्ता डांगे म्हणाले की, “संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाज धुरीणांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वातून व आदर्शातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व घडविता येते. ग्रामीण भागात देशाची खरी संस्कृती आहे. देशाचा विकास होण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणारे श्रमसंस्कार हे आदर्श जीवनासाठी महत्त्वाचे ठरतात. ”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. चे समन्वयक डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गौरी गोसावी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय कु. रेश्मा आकळे यांनी करून दिला. या कार्यक्रमात ईस्माइल मुलाणी गुरुजी यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील अर्जुन गवळी, नितीन शिंदे, संजय बाबर, धीरज साळुंखे, प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, विवेक राखुंडे, डॉ. अनिस खतीब, डॉ. नवनाथ पिसे, डॉ. दत्तात्रय चौधरी, डॉ. अमोल ममलय्या , डॉ. भारत सुळे,प्रा. अमोल मोरे, श्रीमती प्रा. व्ही. पी. जगताप, श्रीमती प्रा. एस.सी. कदम आदी शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी स्वयंसेवक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार कु. ऋतुजा कोळी यांनी मानले.





