स्त्रियांना सन्मान मिळणे गरजेचे – सुनेत्राताई पवार

महिला दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुनेत्राताई पवार, मंचावर प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे व प्रोफे. डॉ. फैमिदा विजापुरे.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – ‘स्त्री’चा सन्मान हा केवळ एक दिवस न करता तो निरंतर केला पाहिजे. स्त्रियांच्या कर्तृत्वाची उज्ज्वल परंपरा भारताला लाभली आहे. घर आणि नोकरी सांभाळणाऱ्या स्त्रियांकडून आदर्श स्वरूपातील व्यवस्थापन शिकणे गरजेचे आहे. भारतीय समाज जीवनात ‘स्त्री’ प्राचीन काळापासून पूजनीय आहे. तो सन्मान यापुढे ही स्त्रियांना मिळणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्राताई पवार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘ महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने आयोजित महिलादिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
सुनेत्राताई पवार पुढे म्हणाल्या की, “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे जशी एक स्त्री असते. असे म्हंटले जाते मात्र प्रत्यक्ष समाजात आपण पाहतो तेंव्हा यशस्वी झालेल्या स्त्रियांच्या पाठीमागे पुरुष असलेले दिसतात. सावित्रीबाईना घडविण्यात ज्योतीरावांचा सहभाग होता, माँसाहेब जिजाउंना घडविण्यात शहाजीराजांचा सहभाग होता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना घडविण्यात सुभेदार मल्हारराव होळकर यांचा सह्भाग हे आपणास विसरून चालणार नाही. म्हणून आजच्याही स्त्रियांच्या पाठीमागे पुरुषांनी सक्षमपणे उभारल्यास स्त्रियांचा कर्तुत्व सिद्ध करता येईल.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “भारतीय समाजजीवनाचा इतिहास पहिला तर आपणास असे लक्षात येईल की, स्त्रियांना मोठ्या प्रमाणात कार्य कर्तुत्व गाजविण्यास संधी मिळाली नाही. तरीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीत मोजक्या स्त्रियांनी कर्तृत्व सिद्ध केले. सध्या स्त्रियांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफे. डॉ. फैमिदा विजापुरे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल यांनी करून दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रोफे. डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे, श्रीमती कुमुदिनी सरदार आदी मान्यवर , शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थ्यीनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेखा भालेराव यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सुनिता मगर यांनी मानले





