स्वेरीमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा

छायाचित्रः- भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सोबत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी संचलित इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व आदी.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूरः गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळून सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, अधिष्ठाता व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतमातेच्या प्रतिमा पूजनानंतर प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत मांडताना म्हणाले की, ‘शासनाच्या नुकत्याच आलेल्या परिपत्रकानुसार थोड्याच दिवसात अर्थात येत्या १ फेब्रुवारी पासून सर्व शाळा व कॉलेज सुरु करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचे ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत अशा विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांनुसार कॉलेजमध्ये यावे. कोरोनाचे सर्व नियम पाळून कॉलेज सुरु होईल आणि येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी आपल्या बरोबरच सर्व शाळा, महाविद्यालयांची मैदाने ‘झेंडावंदन’ साठी पाहिल्याप्रमाणे फुलतील आणि पाहिल्याप्रमाणे सर्व काही सुरळीत होईल.’ असा सकारात्मक विचार डॉ. मिसाळ यांनी व्यक्त केला. यावेळी स्वेरीतील विविध विभागांच्या न्यूज बुलेटीन्सचे तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या ओम हरवाळकर यांच्या ‘यु कॅन हॅक’ या पुस्तकाचे प्रकाशन’ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन केले होते. वकृत्व स्पर्धेत अक्षय माने हे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक सुनील कारंडे तर तृतीय क्रमांक प्रशांत लांडगे यांनी पटकाविला तर पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक आदिती डोके, द्वितीय-अक्षय माने तर तृतीय- सोनल परदेशी यांनी पटकाविला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या व्यवस्थापन विभागाचे सदस्य, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज, बी.फार्मसीचे प्रा. रामदास नाईकनवरे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. सचिन भोसले यांनी फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपणद्वारे विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्याची सोय केली होती. त्यामुळे स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ध्वजारोहणावेळी ऑनलाईन उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.