Uncategorized
पंढरपुरात भाविकांना मोफत अन्नदान
चक्रवर्ती अन्नदानेश्वर महाराज उर्फ आप्पाजी यांचा उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांना गोपाळपूर रस्त्यालगतच्या रिध्दी सिध्दी मंदिराच्या पटांगणामध्ये मोठा मंडप उभारून तेथे येणाऱ्या – जाणाऱ्या भाविकांना तसेच श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनरांगेतील भाविकांनाही मोफत अन्नदान करण्यात येत आहे. सदरचा उपक्रम दिनांक 13 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बनेहट्टी तालुक्यातील बंडिगणी येथील श्री बसवगोपाल नीलमाणिक मठाच्या दासोहरण चक्रवर्ती अन्नदानेश्वर महाराज उर्फ आप्पाजी यांच्यावतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या ठिकाणी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी भेट देवून महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच सदरच्या उपक्रमाचे कौतुक केले व आपली सेवा अशीच सुरू रहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच महाराष्ट्र, आंधप्रदेश, कर्नाटक या तीन राज्यात वर्षात 180 ठिकाणी यात्रा काळात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना अशाचप्रकारे अन्नदान करण्याचे कार्य आप्पाजी यांच्या हातून होत आहे. या सेवेसाठी सुमारे 600 व्यक्ती कोणताही मोबदला न घेता सेवा बजावतात. 300 महिला स्वयंप्रेरणेने स्वयपांक करतात. त्या ही कोणताही मोबदला घेत नाही की मागत नाही दिवसाकाठी किमान लाख ते सव्वा लाख लोक येथे भोजनासाठी येतात.
पंढरपुरातील यात्रेतदेखील गेल्या अनेक वर्षांपासून श्री बसवगोपाल नीलमाणिक मठ श्रीक्षेत्र बंडिगणी मठाचे महाराज यांची सेवा सुरू आहे. गोपाळपूर रस्त्यालगत रिध्दी सिध्दी मंदिर परिसरात टेबलच्या माध्यमातून व पत्राशेडमध्ये स्वयंसेवकाच्या हातून लोकांना स्टीलच्या ताटामध्ये जेवण वाढले जाते. खिर, मसालेभात, बुंदीलाडू, भजी, जिलेबी, वरणभात, वांगे भरित, असे जेवण दिले जाते तर एकादशीला शाबुदाणा खिचडी, भगर, खजूर, तुप, शेंगा, गुळ, केळी असे वाटप केले जाते. आप्पाजींच्या कार्यास आता स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात साथ लाभली आहे. मी जे सर्व करतो ते लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी करतो मी निमित्त मात्र आहे. कार्य करविता पांडुरंग आहे. त्यांच्या कृपेने मी माझी सेवा पंढरपुरात गेल्या अनेक वर्षांपासून करीत आलो आहे असे आप्पाजी महाराज सांगतात. आप्पाजींच्या सदरच्या उपक्रमाचे भाविकांसह नागरिकांतून कौतुक केले जात आहे.
