Uncategorized

पंढरपुरातील बुध्दविहार, कोळी समाज व सफाई कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा -श्रीकांत शिंदे

नगरविकास राज्यमंत्री ना.तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादीची आग्रही मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- पंढरपूर शहरातील यमाई तलाव परिसरात अत्याधुनिक बुध्दविहार उभारण्यासाठी 5 कोटी रूपयांचा निधी मिळावा. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या व पंढरपूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक लावण्यात यावी अशी मागणी राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे. यानंतर ना.प्राजक्त तनपुरे यांनी नगरविकास खात्यातून जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करू व लवकरच मंत्रालयात बैठक बोलावून दोन्ही समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन दिले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, पंढरपूर शहरामध्ये यमाई तलाव परिसरातील शासनाच्या मालकीच्या जागेवर नगरपालिकेने पारित केलेल्या, ठरावामध्ये दक्षिण- पश्चिम कोपऱ्यामध्ये 10 एकर जमिनीवर पर्यावरणपुरक असे अत्याधुनिक बुध्दविहार उभारले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांनी 50 कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केलेली आहे. तरी नगरविकास खात्याकडून या बुध्दविहारासाठी 5 कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा.

तसेच महाराष्ट्र आराध्य दैवत पांडुरंगाच्या सेवेत महादेव कोळी समाज हा पुर्वी सेवेकरी होता. याबाबत इतिहासकालीन पुरावेही आहेत. परंतू गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्यास होत असलेली दिरंगाई यामुळे महादेव कोळी समाजातील अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. आदिवासी कार्यालय हे 50 वर्षापूर्वीचे पुरावे देवूनसुध्दा या समाजाला न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरूण बेरोजगार आहेत. जिल्हा परिषद सोलापूर माजी अध्यक्षा सौ.सुमनताई नेहतराव यांची व त्यांच्या कुटूंबियांची वैधता प्रमाणपत्र आपल्या सरकारच्या काळात देण्यात आले होते. पण पुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मधुकर पिचड हे आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी महादेव कोळी समाज हा पश्चिम महाराष्ट्रात नाहीच असे वारंवार साहेबांना दर्शवित होते. मुळात मधुकर पिचड यांचेच महादेव कोळीचे प्रमाणपत्र हे बोगस आहे. निवडणूकीच्या काळात सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे साहेब व समाजकल्याण मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाला आश्वासन दिले होते. जर आम्ही सत्तेत आलो तर पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय देवू. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना याबाबतचे निवेदन दिले असता त्याबाबत त्यांनी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून बैठक लावण्याचे सुचविले आहे. तरी आपण संबंधित आदिवासी महादेव कोळी समाजाचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची बैठक आपल्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात लवकरात लवकर घेवून सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत.

तसेच पंढरी नगरीत गुजराथी समाज हा सफाई स्वच्छता हीच ईश्वर सेवा मानून आपले जीवन समर्पित करीत आहेत. मानवी विष्टा उचलण्याचे काम, स्वच्छता सफाईचे काम हा समाज स्वातंत्र्य काळापासून करीत आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा समाज सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. या समाजाने वर्षानुवर्षे शासन दरबारी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. तरी आपण न्याय देण्याच्या भूमिकेसंदर्भात आपण प्रयत्न करावा अशी मागणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close