फुले -आंबेडकरी चळवळीच्या लाभार्थ्यानी परिवर्तनवादी चळवळ चालविली पाहिजे.– नरसिंग घोडके

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
निलंगा — भारतात सामाजिक आणि आर्थिकदृष्टया उपेक्षित राहिलेल्या दलित – आदिवासी आणि स्त्रीयांच्या हक्क -अधिकारासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षण दिले. राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण दिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे संरक्षण दिले. त्यामुळे वाय.एल.सूर्यवंशी यांच्यासारखे लाखो लोक आज स्वावलंबनाचेआणि स्वाभिमानाचे जीवन जगत आहेत . महापुरूषांनी चालविलेल्या चळवळीचे ते लाभार्थी आहेत याची जाणीव ठेवून त्यांनी व त्यांच्यासारख्या सेवानिवृत्तांनी महापुरुषांना अपेक्षित असलेल्या समताधिष्ठीत समाजनिर्मीतीसाठी यापुढे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करावेत आणि समाजऋणातून मुक्त व्हावे असे
आवाहन ‘ लसाकम ‘ या सामाजिक संघटनेचे संस्थापक नरसिंग घोडके यांनी केले आहे.
निलंगा तालूक्यातील मदनसूरी येथील मदनानंद विद्यालयातील सहशिक्षक वाय.एल. सूर्यवंशी हे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्या निमीत्ताने ‘लसाकम’ या सामाजिक संघटनेच्या निलंगा शाखेच्या वतीने त्यांचा सेवा गौरव करून सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना घोडके बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आज अनेक स्त्रीया जीवनाच्या विविध क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहेत. त्यांनीही समाजजागृतीसाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस क्रांतीवीर लहुजी साळवे, म.फुले, डॉ.आंबेडकर, राजर्षी शाहू आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. सत्कारमूर्ती वाय.एल. सुर्यवंशी यांचा विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी ‘ लसाकम ‘ चे माजी प्रांताध्यक्ष बी.बी गायकवाड, महासचिव राजकुमार नामवाड, लातूरचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे, सचिव मधुकर दुवे, यु.एम. सूर्यवंशी, जि.प. सदस्य संजय सूर्यवंशी आणि अन्य मान्यवरांची समायोचीत भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘ लसाकम ‘ चे राज्यउपाध्यक्ष मनोहर डाकरे यांनी केले. सूत्रसंचलन गोणे गुरूजी यांनी केले तर गोटमुकले गुरूजी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास लातूर जिल्हयातील कार्यकर्ते आणि निलंगा शहरातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.