Uncategorized

शरद पवार ही एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे – डॉ. राजाराम राठोड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर – “देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसांशी संपर्क ठेवणे. समोरच्याचे ऐकून घेणे, एकदा भेटल्यानंतर त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे, स्थानिक माणसांशी संवाद करणे आणि आपल्या डावपेचाचा प्रतिस्पर्ध्यास थांगपत्ता लागू न देणे ही शरद पवार यांच्या व्यक्तीमत्त्वाचे पैलू आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आयाम पाहिले तर शरद पवार ही एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे असे दिसते.” असे प्रतिपादन परीक्षा नियंत्रक प्रोफे. डॉ. राजाराम राठोड यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या त्र्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ‘शरदचंद्र पवार यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ बाळासाहेब बळवंत, पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे व कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रोफे. डॉ. राजाराम राठोड पुढे म्हणाले की, “शरद पवार यांच्याकडे केवळ एक राजकारणी म्हणून आपण पाहिले तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आपणास समजू शकणार नाही. त्यांना लाभलेला राजकारणाचा आणि विचाराचा वारसा हा त्यांच्या आई शारदाताई पवार यांच्याकडून लाभलेला आहे. लहानपणापासूनच त्यांच्या घरी असलेले राजकीय आणि सामाजिक सौहार्दाचे वातावरण, घरातील समाजवादी विचारसरणी, सत्यशोधकी चळवळीचा वारसा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. शरद पवार यांनी लिहिलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रातून त्यांचे व्यक्तिमत्त्व आपणास समजू शकते. साधी राहणी, सातत्यपूर्ण कार्यमग्नता, कामाचा पाठपुरावा, लोकसंपर्क यागोष्टीमुळे ते यशस्वी झालेले दिसतात.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “ शरद पवार यांनी देशाच्या कृषीमंत्री पदावर असताना केलेले कार्य देशाला दिशादर्शक ठरणारे आहे. रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रत्येक शाळेवर संगणक उपलब्ध करून दिले. व्यावसायिक महाविद्यालये सुरु करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याच मार्गदर्शनाने महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेने नावलौकिक प्राप्त केला आहे.”
यावेळी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्त्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत गव्हाणे यांनी केले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. राहुल मुसळे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close