उच्चशिक्षित मुले घडविणाऱ्या आदर्श माता-पित्यांचा सन्मान होणे गरजेचे – श्रीकांत कसबे
कासेगाव येथील हिराबाई खिलारे यांना "माता मुक्ता साळवे आदर्श आई पुरस्कार" प्रदान


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून चांगल्या पदावर पोहोचविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या आदर्श माता पित्यांचा गौरव होणे अत्यंत गरजेचे आहे. कासेगाव येथील माता हिराबाई व पिता विठ्ठल खिलारे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा मूलमंत्र अंगीकारून आपली मुले उच्चशिक्षित केली. ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा उचित असा आदर्श माता पिता म्हणून गौरव होत आहे.हॆ समाजाला प्रेरणादायी आहे. अशी भावना जोशाबा टाइम्सचे संपादक श्रीकांत कसबे यांनी व्यक्त केली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त संघ कुर्डूवाडी यांचे वतीने ” माता मुक्ता साळवे आदर्श आई पुरस्कार “ वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

कासेगाव तालुका पंढरपूर येथे 12 जानेवारी जिजाऊ जयंती निमित्त पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. आदर्श माता हिराबाई व पिता विठ्ठल खिलारे यांचा गौरव स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, शाल पुष्पहार संपूर्ण कपडे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पुढे बोलताना श्रीकांत कसबे म्हणाले की आज उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय मोक्याच्या जागा मिळविण्यासाठी युवकांनी प्रयत्न केला पाहिजे. पोतराज मुरळी देवदासी जोगती तयार झाले नाही पाहिजेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे साहेब व दत्तात्रय कांबळे सर ही माजी पोतराज असून केस कापल्याने त्यांची प्रगती झाली आहे कोणतेही नुकसान झाले नाही. दैववादाला व अंधश्रद्धेला मूठमाती देऊन वकील,डॉक्टर, इंजिनिअर प्राध्यापक, ऑफिसर निर्माण होणे ही काळाची गरज आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सेवानिवृत्त कर्मचारी संघटना कुर्डूवाडी यांनी पुरस्काराचे आयोजन केली हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

प्रास्तविक भाषणात कर्मचारी संघांचे मार्गदर्शक एन. एस. खंदारे म्हणाले कीं आदर्श माता हिराबाई यांनी रात्री चुलीवर भाकरी शेकता शेकता चुलीच्या उजेडात मुलांच्या हातात पाटी पेन्सील देऊन त्यांच्या कर्तृत्वाच्या रेषा गडद करून भविष्याच्या वाटांना उजेड दिला. त्यालाच त्यानी महात्मा गौतम बुध्दांच्या अंतःप्रेरणेचा “दीप” केला.म्हणून मोठा मुलगा सुभाष एम.ए. बी. एड. सेट, नेट व पी.एच.डी करून तो उरूळी कांचन येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. तर लहान मुलगा सचिन बी.ए.एल.एल.बी. व एम.एम. डब्लू होऊन मुंबई महानगरपालिकेत बरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे.
लेकरांची नशीब लिहिण्यासाठी तुम्ही मनुने नेमलेल्या बरम्या किंवा सटवीच्या लिखाणावर अवलंबून राहिला नाहीत. तिच्या हातातली लेखणी हिसकावून घेऊन मुलांची नशीब आपल्या कष्टानं त्यांच्या कपाळावर कोरलीत.
तुमच्या अपार कष्टाला व मुलांना घडविण्याच्या जिद्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले असून गेली तीन वर्ष हा उपक्रम आम्ही राबवत आहोत.

यावेळी मंगळवेढा शिक्षण अधिकारी बिभीषण रणदिवे यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून तरुण पिढीने समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे असे आवाहन केले. तसेच हिराबाई व विठ्ठल आदर्श माता पित्याचा समाजाने आदर्श घ्यावा असे आवाहन केले.कुर्डूवाडी वरून कासेगाव ला येऊन सत्काराचे आयोजन करणाऱ्या कर्मचारी संघाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

दत्तात्रय कांबळे सर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व ते शालेय जीवनात स्वतः पोतराज असून केस कापले ते शिक्षक होईपर्यंतचा अनुभव त्यांनी कथन केला.
ज्येष्ठ नेते आबासाहेब वाघमारे (अध्यक्ष बहुजन लोकअभियान) म्हणाले की आई-वडील कसे असावेत व मुले कशी असावीत त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हिराबाई व विठ्ठल खिलारे व त्यांची मुले सुभाष व सचिन यां कुटुंबाचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे. ज्याने शिक्षणाचं कास धरली त्यांची प्रगती झाली आहे.
यांवेळी गंगथडे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.. सुभाष खिलारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले कीं,माझ्या आई-वडिलांचा झालेला सन्मान माझे दिवंगत चुलते दादासाहेब खिलारे यांच्या स्मृतीस अर्पण करत आहे असे सांगून त्यांनी आयोजकाचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा प्रा. सुभाष खिलारे लिखित” अभागी कन्या “ कथा संग्रहाची प्रत व संविधानाची उद्देशिका पत्रिका व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंचकावर कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव गायकवाड, पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पा जाधव,ज्येष्ठ नेते अर्जुन खिलारे, नागेश नाईकनवरे सर, माजी नगरसेवक अंबादास वायदंडे, प्रा. जयसिंग खिलारे, दत्तात्रय खिलारे सर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल खिलारे सर यांनी केले. तर मानपत्राचे वाचन एन एस खंदारे यांनी केले.



