प्रतिगामी शक्तींच्या विरुद्ध तीव्र लढ्याची गरज : लक्ष्मण माने
डॉ. आ. ह. साळुंखे यांना "सत्यशोधक समाजरत्न जीवनगौरव "पुरस्कार प्रदान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
सातारा दि. ०३ ऑक्टोबर २०२३ -समाजात वाढत निघालेली धर्मांधता, जातीयवाद आणि संविधानिक मूल्यांची होणारी पायमल्ली लक्षात घेता येणाऱ्या काळात प्रतिगामी शक्तींच्या विरुद्ध तीव्र लढायची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले. नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त व महात्मा जोतीराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना सत्यशोधक समाजरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, उपाध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ, सुप्रसिद्ध वक्ते व साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, आजरा येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नवनाथ शिंदे, पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वायदंडे, ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, सुप्रसिद्ध साहित्यिक व संशोधक डॉ. शरद गायकवाड, शाहीर प्रकाश फरांदे, शाहीर श्रीरंग रणदिवे, लोकायत प्रकाशनाचे संचालक राकेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार समारंभात बोलताना किशोर बेडकीहाळ म्हणाले, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत समर्पक वृत्तीने त्यांनी काम केले. मुंबई विद्यापीठाचे अ. का. प्रियोळकर संशोधन पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे, यावरूनच त्यांच्या संशोधनाचे मूळ लक्षात येते. आज या संशोधनातून समोर आलेल्या विचारांची समाजाला नितांत आवश्यकता भासत आहे.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले , जो समाज आपला इतिहास विसरतो त्याला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा मिळते. देशातील प्रतिगामी विचारांचे वातावरण ऐक्यास घातक असून मानवतेचा विचार अधिकाधिक जपण्याची गरज आहे.
प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महामानवांच्या विचारपरंपरेचे पाईक होऊन पुढील काळात समतेचा विचार जपण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचे म्हटले.
डॉ. नवनाथ शिंदे म्हणाले, आजचा काळ प्रतिगामी वातावरणाचा असला तरी आपली सत्यशोधकी विचार परंपरा या वातावरणाला बदलण्यासाठी पुन्हा जोमाने कार्यरत होईल. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केलेले कार्य आपल्याला भविष्याची दिशा देणारे असून त्या माध्यमातून परिवर्तन घडू शकेल, असा विश्वास वाटतो.
प्रकाश वायदंडे यांनी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त केली. समाजात समतावादी विचार पेरण्याचे कार्य डॉ. साळुंखे यांनी केले असून ते पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे यांनी समाजातील अवैज्ञानिक वातावरण व परंपरावादी दृष्टीकोन याबद्दल चिंता व्यक्त केली. बहुजन विचार परंपरेचे पुनरुज्जीवन व आपल्या मूळ वैचारिक वारशाचे जतन करण्याची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली.
पत्रकार विजय मांडके म्हणाले डॉ. आ. ह. साळुंखे यांनी भारताच्या इतिहासातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांची उत्तरे आपल्या विवेक बुद्धीने व तर्काच्या आधारे दिली असून त्यावर समाजात सातत्याने विचारमंथन गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात साळुंखे सरांचे साहित्य कार्यकर्ते व अभ्यासकांना प्रेरणा देण्याचे काम करत आले आहे.
यावेळी नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कांबळे यांनी पक्षाची भूमिका व सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील कार्य स्पष्ट केले. शोषण विरहित समाज निर्मितीसाठी संघटना कार्यरत असून जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन पक्ष कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचा प्रारंभ शाहीर श्रीरंग रणदिवे यांच्या स्वागत गीताने झाला. शाहीर प्रकाश फरांदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्यावरील पोवाड्यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद गायकवाड यांनी केले. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या कार्याचे महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना डॉ. गायकवाड म्हणाले महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्रात डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले असून या संशोधनातून बहुजन समाजाला नवी दृष्टी देण्याचे काम केले आहे.
गोतम करुणादित्य यांनी डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले.
नॅशनल ब्लॅक पॅंथर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर प्रा. निरंजन फरांदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास काँग्रेस सेवा दलाचे सातारा जिल्हा प्रमुख प्रताप देशमुख, पत्रकार व साहित्यिक अरुण जावळे, ज्येष्ठ कॉम्रेड रणनवरे,आदी मान्यवर उपस्थित होते.