छत्रपती शिवाजी महाराजांनी एकतेचा संदेश दिला – डॉ. बजरंग शितोळे
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- “छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे बनू शकले. कारण त्यांच्यावर बालपासून समता, बंधुत्त्व याचे संस्कार होते. त्यांच्या राजदरबारात उच्च नीचता नव्हती. सर्व जातीचे सैनिक त्यांच्या सैन्यामध्ये होते. एकतेचा विचार त्यांनी समाजाला दिला. म्हणूनच सर्वसमावेशक स्वराज्य ते निर्माण करू शकले.” असे प्रतिपादन प्रोफेसर डॉ. बजरंग शितोळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ‘शिवस्वराज्य दिनानिमित्त’ सांस्कृतिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी विषयक पोवाड्यांची ध्वनीफीत वाजविण्यात आली.
प्रोफेसर डॉ. बजरंग शितोळे पुढे म्हणाले की, “शाहिस्तेखानाची फजिती, अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका हे शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग आहेत. त्यातून त्यांचे युध्दकौशल्य, व्यवस्थापनातील कौशल्य, संघटनकौशल्य याची प्रचीती येते. अफजलखानाने शिवाजी महाराजांना चेतवण्यासाठी जनतेवर अन्याय अत्याचार केले. मात्र या प्रसंगाला शिवाजी महाराजांनी धीरोदात्तपणे तोंड दिले.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करून घेण्यामागे राजमान्यता ही बाब होती. राज्यस्थापना ही महत्वपूर्ण गोष्ट होती याची साक्ष मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार हे सर्वसमावेशक होते. त्यांच्या विचार आणि कार्यातून प्रेरणा घेवून नवे नेतृत्व निर्माण होते. समाजात सहिष्णूवृत्ती वाढीस लागते. महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम चालू करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राजाराम राठोड यांनी केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य चंद्रकांत रासकर, प्रोफेसर डॉ. तानाजी लोखंडे, स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ. मधुकर जडल, महाविद्यालय अंतर्गत सुधार समिती समन्वयक डॉ. अमर कांबळे, समारंभ समितीचे प्रमुख डॉ. दत्ता डांगे व कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. रमेश शिंदे यांनी मानले.
…………