भविष्यकाळात स्वेरीचे सेवा कार्य लोकाभिमुख ठरेल-खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर
स्वेरीत‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे उदघाटन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे’ आणि या उक्तीला साजेसं कार्य स्वेरीच्या माध्यमातून घडत आलेलं आहे. स्वेरी आणि रोंगे कुटुंबिय म्हणजे एक वेगळेपण, आपुलकी, तळमळ आणि विनम्रता यांचा मिलाप आहे आणि हेच गुण स्वेरी परिवारातील प्रत्येक सदस्यात रुजलेले आहेत. त्यामुळे भविष्यकाळात स्वेरीकडून केली जाणारी आरोग्याची अथवा शिक्षणाची सेवा ही अल्पावधीत लोकाभिमुख ठरेल. स्वेरीचे हे सेंटर जिल्ह्यातील सर्व लोकांना मदतीचे केंद्र बनेल. डॉ. रोंगे सरांनी सामाजिक जाणीवेतून हे आधुनिक पद्धतीचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. भविष्यात हा आजार कमी होवून पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी येतील आणि सर्व काही सुरळीत सुरु होईल.’ असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या कॅम्पसमधील मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मध्ये ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे आज शुक्रवार, दि. २१ रोजी दुपारी दीड वाजता माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी आमंत्रित मान्यवरांचे स्वागत करून ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ संदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे योगदान, सहकार्य आणि या सेंटर मधून चालणारी प्रक्रिया यांची विस्तृतपणे माहिती दिली. कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने सर्व सोयींनी युक्त अशा ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ची रचना केलेली असून यामध्ये ऑक्सीजनचे १५ बेड व साधे २०० बेड असे मिळून एकूण २१५ बेडची सोय या सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
या सेंटरचा फायदा पंढरपूर तालुक्यातील रुग्णांसह आसपासच्या तालुक्यातील रुग्णांनाही होणार आहे. पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले म्हणाले की, ‘ स्वेरी सामाजिक जाणिवेतून नेहमीच प्रशासनाला मदत करत असते. कोणतीही वारी असो वा वारी पूर्व किंवा वारी उत्तर स्वच्छता अभियान असो समाजाशी निगडीत असलेल्या प्रत्येक उपक्रमात स्वेरीला साद घातली की स्वेरी प्रशासनाला मदतीचा हात पुढे करत असते. कोविडच्या पहिल्या लाटेत सुद्धा स्वेरीने कोविड केअर सेंटर उभे करून सुमारे आठशे रुग्णांना बरे करण्याचे कामही केले आहे. माफक दरात रुग्णांना सेवा देण्याचे कार्य ‘स्वेरी’ उत्तमपणे करेल. यामुळे कोविड रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल. तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. ते अहोरात्र सेवा बजावून रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.’ अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की, ‘उत्तम ज्ञानार्जनाचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासताना रुग्णांसाठी आणि समाजासाठीही स्वेरी परिवार आणि या सेंटरचे वैद्यकीय अधिकारी नक्कीच उत्तम कार्य करतील आणि ही महामारी नक्कीच कमी होईल हा मला विश्वास आहे. स्वेरीचे हे कोविड सेंटर गोरगरिबांना मदत करणारे सेंटर म्हणून ओळखले जाईल.’ यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले,पंढरपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, पांडुरंग परिवाराचे युवा नेते रोहन परिचारक, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त एच.एम. बागल, श्री.दानोळे, पंढरपूर न.पा.चे आरोग्य सभापती विवेक परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, श्री.अंबुरे, राजभाऊ जगदाळे, प्रकाश घोडके, गोपाळपूरचे सरपंच विलास मस्के, डॉ. पाटील, प्रा. काळे, प्रा. देशमुख, समन्वयक डॉ. सोमनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. कोविड च्या पार्श्वभूमीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हा उदघाटन समारंभ पार पडला. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी सर्वांचे आभार मानले.